आता जातपंचायतच बहिष्काराच्या विळख्यात!
By Admin | Updated: March 7, 2016 00:20 IST2016-03-06T21:10:52+5:302016-03-07T00:20:49+5:30
अनिष्ट रिवाजाला कडाडून विरोध : भुर्इंज आणि भिरडाचीवाडी येथील गोपाळ बांधवांचाही निर्णय -लोकमत विशेष

आता जातपंचायतच बहिष्काराच्या विळख्यात!
भुर्इंज : आजपर्यंत झालं ते झालं; पण यापुढं जातपंचायतीच्या वाटंला जाणार नाय. आमचाबी जातपंचायतीवर बहिष्कार असून आमी पण काय झालं तर पोलीस ठाण्यातच दाद मागू, असे सांगत भुर्इंज आणि भिरडाचीवाडी या दोन्ही ठिकाणच्या गोपाळवस्तीतील समाजबांधवांनी जातपंचायतीला मूठमाती देण्याचा निर्णय घेतला.
पाचवड, ता. वाई येथे जातपंचायत भरवून दोघांना शिक्षा केल्याप्रकरणी पोलीस कारवाई झाल्यानंतर पाचवड येथील गोपाळ समाजाने सर्वप्रथम जातपंचायतीला मूठमाती देण्याचा निर्णय घेतला. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये वाचल्यानंतर भुर्इंज आणि भिरवाचीवाडी या दोन्ही गोपाळवस्तीतही हा निर्णय घेण्यात आला. जातपंचायत भरवणाऱ्या पंचांवर आता कायद्यानुसार कारवाई सुरु आहे. मात्र आता अशा कारवाईची गरज भासू नये, अशा दिशेने सकारात्मक पाऊल गोपाळ समाजाने टाकायला सुरुवात केली असून त्यामध्ये युवकांचा पुढाकार लक्षणीय आहे.
दारिद्र्य, शिक्षणाचा अभाव, व्यसनाधिनता, मटका व जुगाराचे वेड यातून आलेला कर्जबाजारीपणा आदी कारणांमुळे गोपाळ समाजात प्रचंड अज्ञान आहे. या अज्ञानामुळेच हा समाज जग ज्या वेगाने आणि ज्या वाटेवर धावत आहे, त्यापासून कोसो मैल दूर आहे. त्याचाच परिपाक म्हणून या समाजातील छोट्या-मोठ्या तक्रारींवर जातपंचायतीत दाद मागितली जाते. मटका आणि जुगारात या समाजातील अनेक जणांच्या आयुष्याची अक्षरश: वाट लागली आहे. त्यामुळे जातपंचायतीला प्रतिबंध करण्यासोबत, अशा जातपंचायती भरवणाऱ्यांवर कारवाई करण्यासोबत या समाजाच्या दैनावस्थेला जी प्रमुख कारणे आहेत त्यावरही इलाज करणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
भुर्इंज आणि भिरडाचीवाडी येथील गोपाळ समाजाने जातपंचायतीकडे आता पाठ फिरवण्याचा निर्णय घेतला आहे, ही त्यांच्यासाठी नव्या बदलाची सुरुवात आहे. (प्रतिनिधी)
पोलिसांची
भीती वाटते
समाजातील लोकांना पोलिसांची भीती वाटते. त्यामुळे आजपर्यंत पोलिसांकडे न जाता लोक जातपंचायत बोलवायचे. यापुढील काळात पोलिसांनी समाजातील लोकांच्या अडचणी, समस्यांबाबत काळजीने लक्ष घातल्यास पोलिसांबाबत भीती दूर होऊन लोक विश्वासाने त्यांच्याकडे जातील.
- सचिन जाधव
मटका, जुगारापायी कर्जबाजारी
बँडपथकात वाद्य वाजवण्यासोबत, मजुरीची कामे करुन हा समाज जगतो. हातावर पोट असले तरी या समाजातील अनेकांवर लाखांचे कर्ज आहे. मटका, जुगार, आॅनलाईन लॉटरी यामध्ये हा समाज कर्जबाजारी झाला आहे. या समाजातील महिलाही मटका खेळण्यामध्ये आघाडीवर आहेत. विशेष म्हणजे त्यासाठी खासगी सावकारांकडून त्यांना वर्षाला दामदुप्पट अशा भरभक्कम व्याजदाराने कर्ज पुरवले जाते. कर्जाची परतफेड न झाल्यास संबंधित कर्जदाराच्या घरातील मुलगी उचलून नेण्यापर्यंतचे प्रकार घडतात.
आता पोलिसांकडेच जाणारभुर्इंज व भिरडाचीवाडी येथे गोपाळ समाजातील शंभरहून अधिक कुुटुंबे आहेत. या दोन्ही ठिकाणच्या लोकांनी जातपंचायतीत न जाता पोलिसांकडे जायचे, असा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पाळला जाणार असून यापुढे जातपंचायतीचा प्रकार घडणार नाही.
- तेजस मोरे
जातपंचायतीचे नावही घेणार नाही
आम्हाला आमचा वाढदिवस कधी असतो ते माहिती नाही. आमचे शिक्षणही झाले नाही. मोलमजुरी करुन आम्ही जगतोय. जातपंचायतीवर झालेल्या कारवाईमुळे समाजात भीतीचे वातावरण आहे. लग्नसराईचा हंगाम असून आमचे लोक वाजवायला जायलासुद्धा घाबरत आहेत. यापुढे जातपंचायतीचे नाव घ्यायचे नाही, असे सर्वांनी ठरवले आहे.
- सागर चव्हाण
गोपाळ समाजासाठी योजना राबविणार
भुर्इंजमधील गोपाळ समाजाला राहण्यासाठी जाधवराव कुटुंबीयांनी जागा दिली आहे. भुर्इंजसारख्या प्रगत गावातील हा समाजदेखील प्रगतीच्या वाटेवर यावा, यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विशेष योजना राबवल्या जातील. या समाजाच्या अज्ञानाचा आणि दारिद्र्याचा फायदा घेऊन त्यांना नाडणाऱ्यांवर कारवाई करण्यासोबत, जातपंचायतीसारख्या अनिष्ठ प्रथांना पोलिसांनी आळा घालावा.
- राजनंदा जाधवराव, सदस्या, जिल्हा परिषद