लोणंद पाठोपाठ खंडाळ्याला आता नगरपंचायतीचे वेध..

By Admin | Updated: April 20, 2016 00:25 IST2016-04-19T22:37:59+5:302016-04-20T00:25:10+5:30

एप्रिल अखेर अधिसूचना निघण्याची राजकीय वर्तुळात चर्चा

Now after the election of Lonand Khandala, the Nagar Panchayat survey. | लोणंद पाठोपाठ खंडाळ्याला आता नगरपंचायतीचे वेध..

लोणंद पाठोपाठ खंडाळ्याला आता नगरपंचायतीचे वेध..


खंडाळा : लोणंद नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर खंडाळा नगरपंचायतीचा निर्णय कधी होणार याचे वेध खंडाळकरांना लागले असून, पुढील रणनीतीसाठी सर्वच पक्ष सज्ज असल्याचे जाणवू लागले आहे. तालुक्याच्या ठिकाणच्या ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीत करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यानंतर याची घोषणाही विधानसभेत करण्यात आली होती. त्यामुळे एप्रिलअखेर खंडाळा नगरपंचायतीची अधिसूचना निघण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे.
नगरविकास खात्याच्या मंजुरीनंतर ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये करण्याची प्रक्रिया सुरू होते. राज्याचे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी विधानसभेच्या अधिवेशनात खंडाळा नगरपंचायत करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार एप्रिल अखेरपर्यंत कायदेशीर सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन अधिसूचना निघण्याची शक्यता आहे.नगरपंचायतींना महाराष्ट्र रिजनल अ‍ॅन्ड टाऊन प्लॅनिंग कायदा १९६६ लागू होत असतो. त्यामुळे नगरपंचायत क्षेत्राचा झपाट्याने विकास होतो. विशेषत: रस्ते, पाणी योजना, दलित वस्ती विकास, सांडपाणी योजना यांसह पायाभूत सुविधा नागरिकांना पुरविणे सोपे जाते. तसेच नगरपंचायतीसाठी शासनाकडून विशेष निधी पुरविला जात असल्याने निधीअभावी रखडलेली कामे पूर्ण करणे सहजसोपे होते.
पुण्यापासून अतिशय जवळचे आणि राष्ट्रीय महामार्गालगत असणारे खंडाळा हे तालुक्याचे ठिकाण आहे. त्यामुळे औद्योगिक विकासही झपाट्याने वाढू लागला आहे. तसेच वाढते नागरिकीकरण, व्यापारी व्यवसाय तसेच कामगार वर्गाचेही राहते प्रमाण वाढू लागले आहे. त्यादृष्टीने खंडाळ्याची नगरपंचायत महत्त्वाची मानली जाते.खंडाळ्याच्या नगरपंचायतीचा निर्णय अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपल्याने सर्वच राजकीय पक्षांनी आपली रणनीती काय असावी याबाबत प्रमुखांच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. वास्तविक अधिसूचना जारी झाल्यानंतर सहा महिन्यांमध्ये निवडणुका घेणे अपेक्षित असते त्यामुळे राजकीय वर्तुळात यादृष्टीनेही विचार केला जात आहे. (प्रतिनिधी)


खंडाळ्याचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर आम्ही त्याचे स्वागतच करू. सत्तेच्या माध्यमातून काँग्रेस नेहमी लोकांच्या संपर्कात असते. त्यामुळे त्यापुढील प्रक्रियेसाठी काँग्रेसचे सर्वच कार्यकर्ते सज्ज राहतील.
- अनिरुद्ध गाढवे, पं.स. सदस्य, काँगे्रस.
खंडाळा ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीत झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस स्वागतच करेल. खंडाळ्यात राष्ट्रवादी प्रबळ आहे. त्यामुळे निर्णय झाल्यास आम्ही पुढच्या रणनीतीसाठी योग्य ती रचना करू.
- शैलेश गाढवे, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी औद्योगिक सेल.
खंडाळा नगरपंचायतीचा होणारा निर्णय नागरिकांच्या हिताचा आहे. त्यामुळे शिवसेना त्याचे स्वागतच करेल. कार्यकर्त्यांच्या समन्वयातून आम्ही पुढील प्रक्रियेसाठी तयारी करू.
- अजित यादव, तालुकाप्रमुख, युवासेना खंडाळा
नगरपंचायत निर्णयाचे भाजपा स्वागतच करेल. सर्वांना बरोबर घेऊन खंडाळ्याचा कायापालट करण्यासाठी आम्ही कार्यकर्त्यांसह सज्ज राहणार आहोत.
- अभिजित खंडागळे, विभागप्रमुख ,
पश्चिम महाराष्ट्र कामगार भाजपा संघटना

Web Title: Now after the election of Lonand Khandala, the Nagar Panchayat survey.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.