जिल्हा बँकेला ‘आयकर’ची पाच कोटी भरण्याची नोटीस
By Admin | Updated: August 24, 2016 00:28 IST2016-08-24T00:04:02+5:302016-08-24T00:28:57+5:30
जुने प्रकरण : प्रोत्साहन अनुदानावर लावला कर

जिल्हा बँकेला ‘आयकर’ची पाच कोटी भरण्याची नोटीस
सांगली : जिल्हा बॅँकेने जिल्ह्यातील शाखांना दिलेल्या ११ कोटींच्या प्रोत्साहन अनुदानावर पाच कोटी आयकर भरण्याची नोटीस आयकर विभागाने पुन्हा बजावली आहे. याप्रकरणी आता जिल्हा बॅँक आयकर विभागाच्या पुण्यातील कार्यालयाकडे अपील करणार आहे. जिल्हा बॅँकेने २०१२-१३ या आर्थिक वर्षात शाखांना ११ कोटी रुपयांचे प्रोत्साहन अनुदान दिले होेते. एकूण नफ्यातून या अनुदानाचे वाटप करण्यात आले होते. याशिवाय निव्वळ नफ्यावर पुन्हा आयकरचा भरणा केला होता. रितसर कर भरल्यानंतर पुन्हा आयकर विभागाने प्रोत्साहन अनुदानावर कर भरण्याची नोटीस बजावली होती. अनुदानावर रितसर ३० टक्के आयकर आणि त्यावर दंड अशी एकूण पाच कोटी रुपये भरण्याची सूचना त्यांनी दिली आहे. याच कराविषयी आयकर विभागाने दुसरी नोटीस जिल्हा बॅँकेला पाठविली आहे. प्रोत्साहन अनुदानावर कर लागू होत नाही, असे बॅँक प्रशासनाचे म्हणणे आहे. यापूर्वी हे म्हणणे आयकर विभागासमोर मांडण्यातही आले आहे. कराचा हा वाद गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. अद्याप तो निकालात निघाला नाही.
दुसरी नोटीस प्राप्त झाल्यानंतर त्यास उत्तर देण्यात येणार आहे. बॅँकेमार्फत आता आयकर विभागाच्या पुणे कार्यालयाकडे दाद मागण्याची तयारी सुरू आहे. एकूण नफ्यातून ही रक्कम देण्यात आली असली, तरी बॅँकेच्या तो प्रक्रियेचा भाग आहे. शाखांच्या सक्षमीकरणासाठी निधीची तरतूद करण्याची आवश्यकता आहे. त्याच उद्देशाने प्रोत्साहन अनुदान देण्यात आल्याबाबत बॅँकेने स्पष्टीकरण दिले आहे. आता पुन्हा याच मुद्यावर आता लढाई सुरू राहणार आहे. (प्रतिनिधी)
यंदाही विक्रमी आयकर
बँकेच्या इतिहासात आजवर सर्वाधिक नफा चालूवर्षी झाला. ढोबळ नफा ८४ कोटी ७० लाख इतका झाल्याने २३ कोटींचा आयकर बॅँकेने भरला आहे.