सल्यासह सातजणांना मोक्काची नोटीस
By Admin | Updated: October 8, 2015 21:50 IST2015-10-08T21:50:21+5:302015-10-08T21:50:21+5:30
पोलिसांच्या हालचाली : टोळीला कधीही अटक होण्याची शक्यता

सल्यासह सातजणांना मोक्काची नोटीस
कऱ्हाड : कुख्यात गुंड सलीम शेख ऊर्फ सल्या चेप्या याच्यावर दाखल असलेल्या तेरा गुन्ह्यांची माहिती संकलित करण्याचे काम सध्या गतीने सुरू आहे. सल्या चेप्यासह त्याच्या टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आल्यामुळे या प्रकरणाचा तपास आता पोलीस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवकरण करीत असून, या कारवाईची नोटीस आरोपींना बजावण्याच्या सूचना त्यांनी पथकाला दिल्या आहेत. त्यामुळे सल्याच्या टोळीवर कधीही अटकेची कारवाई होऊ शकते.बबलू माने खून प्रकरणात पोलिसांनी सल्या चेप्यासह त्याचा मुलगा असिफ व अन्य सातजणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी असिफ याच्यासह इतर सहाजणांना अटक केली आहे. तर सल्या चेप्या एका गुन्ह्यात सांगली पोलिसांच्या अटकेत आहे. या टोळीवर मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलिसांनी विशेष पोलीस महानिरीक्षकांना पाठविला होता. तो प्रस्ताव दोन दिवसांपूर्वीच मंजूर झाला आहे. त्यामुळे सातजणांवर मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईचा अहवाल बुधवारी उपअधीक्षक शिवणकर यांनी विशेष न्यायालयात सादर केला. तसेच सध्या सल्यावर दाखल असलेल्या तेरा गंभीर गुन्ह्यांची सविस्तर माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे. सल्यावर १९८९ सालापासून ३६ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी काही गुन्ह्यांत तो निर्दाेष सुटला असून, काही गुन्हे अद्यापही न्यायालयीन प्रक्रियेत आहेत. सातारा व सांगली जिल्ह्यांमध्ये गत दहा वर्षांमध्ये घडलेल्या गंभीर गुन्ह्यात सल्याचा सहभाग असल्याचे वेळोवेळी पोलीस तपासात उघड झाले आहे. सध्या तेरा गंभीर गुन्ह्यांची माहिती एकत्रित करण्याचे काम पोलीस करीत आहेत.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक शिवणकर करीत आहेत. तसेच कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक एच. एन. काकंडकी यांच्यासह इतर अधिकाऱ्यांचा तपास पथकात समावेश आहे.
कारवाईची नोटीस सल्यासह इतर सहा संशयितांना बजावण्यास गुरुवारी सुरुवात झाली. या नोटीसवर त्यांच्या सह्या घेऊन तो अहवाल विशेष न्यायालयात सादर केला जाणार
आहे. त्यानंतर आरोपींच्या अटकेची कार्यवाही सुरू होणार आहे.
(प्रतिनिधी)
सल्याच्या मालमत्तेचीही चौकशी
सल्याने प्रत्येकवेळी वेगवेगळ्या साथीदारांना सोबत घेऊन गुन्हा केला आहे. त्या साथीदारांचीही पोलिसांकडून चौकशी होण्याची शक्यता आहे. तसेच गत दहा वर्षांतील तेरा गंभीर गुन्ह्यांची यादीही पोलिसांनी तयार केली असून, या गुन्ह्यांचा तपास करतानाच बबलू माने खून प्रकरणाचा कट कसा रचला, याचीही पुन्हा चौकशी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सल्याच्या मालमत्तेची चौकशी होण्याचीही चिन्हे आहेत.