शिक्षणाधिकाऱ्यांच्या दारावर अखेर नोटीस
By Admin | Updated: October 9, 2015 21:10 IST2015-10-09T21:10:05+5:302015-10-09T21:10:05+5:30
शिक्षकांना भोवतोय बहिष्कार : आदेश स्वीकारुनही कारवाई नाही; बारा तासांचा ‘अल्टिमेटम’

शिक्षणाधिकाऱ्यांच्या दारावर अखेर नोटीस
कऱ्हाड : शासकीय कामावर बहिष्कार घालणाऱ्या शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश तहसीलदार राजेंद्र शेळके यांनी गुरुवारी रात्री दिले. हा आदेश स्वीकारण्यास टाळाटाळ करणाऱ्या गटशिक्षणाधिकारी रवींंद्र खंदारे यांनी शुक्रवारी सकाळी आदेश स्वीकारला खरा; मात्र गुन्हे दाखल करण्याची कोणतीच प्रक्रिया न केल्याने तहसील कार्यालयाच्या वतीने गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर दारावर नोटीस चिकटविण्यात आली आहे.दरम्यान, ‘बारा तासांत संबंधित शिक्षकांवर कारवाई करा; अन्यथा आपल्यावर कारवाई का करू नये,’ या आशयाची ही नोटीस चिकटवल्याने महसूल प्रशासन व शिक्षण विभाग यांच्यात आता चांगलीच जुंपल्याचे चित्र दिसत आहे. दि. १० आॅक्टोबरपासून होणाऱ्या लोकसंख्या नोंदवही अद्ययावतीकरणाच्या कामावर तालुक्यातील शिक्षक संघटनांनी बहिष्कार टाकला आहे. गुरुवारी झालेल्या प्रशिक्षणास प्रशासकीय आदेश असतानाही कऱ्हाड तालुक्यातील ५०५ प्राथमिक शिक्षकांनी त्याकडे पाठ फिरवली. राष्ट्रीय कामात अडथळा आणण्याच्या कारणावरून तहसीलदार राजेंद्र शेळके यांनी गटशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे यांना संबंधित शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्याने शिक्षण वर्तुळात खळबळ माजली होती. (प्रतिनिधी)
शिक्षणाधिकाऱ्यांचा मोबाइल बंद...
शिक्षकांच्यावर गुन्हे दाखल करण्याबाबत शिक्षण विभागाने काय केले, याची माहिती घेण्यासाठी गटशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी आपला भ्रमणध्वनी बंद करून ठेवल्याने संपर्क होऊ शकला नाही.