झेडपी सभापतिपद न मिळाल्याने खदखद !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:38 IST2021-02-13T04:38:05+5:302021-02-13T04:38:05+5:30
नितीन काळेल लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील वरिष्ठांनी जिल्हा परिषद सभापतिपद न बदलण्याचा निर्णय घेतल्याने इच्छुकांत खदखद ...

झेडपी सभापतिपद न मिळाल्याने खदखद !
नितीन काळेल
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील वरिष्ठांनी जिल्हा परिषद सभापतिपद न बदलण्याचा निर्णय घेतल्याने इच्छुकांत खदखद कायम आहे. त्याचबरोबर नेत्यांनी शब्द देऊनही पद न मिळाल्याने संबंधितांवर दुसऱ्यांदा नाराज होण्याची वेळ आली आहे. त्यातच यापुढेही संधी मिळेल की नाही याचीही आता श्वास्वती राहिलेली नाही.
जिल्ह्यात २०१७ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्या. त्यामुळे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आहे. पुढीलवर्षी जानेवारी महिन्यात जिल्हा परिषदेची निवडणूक होत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील काही सदस्यांनी सभापतिपद मिळावे म्हणून देव पाण्यात घातले होते. कारण, पहिल्या अडीच वर्षांचा कार्यकाल संपल्यानंतर मागीलवर्षी जानेवारी महिन्यात अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडणुकीनंतर सभापतींची निवड झालेली. त्यावेळी झेडपी अध्यक्षांच्या बंगल्यावर राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची बैठक झाली होती.
या बैठकीत कृषी सभापतिपदासाठी धैर्यशील अनपट, समाजकल्याणसाठी बापूराव जाधव, महिला व बालकल्याण सभापतीसाठी डॉ. भारती पोळ यांचे नाव आघाडीवर होते. पण, ऐनवेळी सर्वच बदल झाले. त्यामुळे सभापतिपदाचे दावेदार मागे पडले आणि अनपेक्षितपणे काही नावे समोर आली. अर्थ व शिक्षण समिती सभापतिपदी मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापतिपदी मंगेश धुमाळ, समाजकल्याण सभापती म्हणून कल्पना खाडे आणि महिला व बालकल्याणच्या सभापतिपदी सोनाली पोळ यांचे नावे जाहीर करण्यात आले.
हे होत असताना राज्य विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी एक वर्षासाठी पदे असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे त्यावेळी नाराज झालेले दावेदार वर्ष कधी संपते याचीच वाट पाहत होते. मात्र, वर्ष संपल्यानंतरही त्यांच्या पदरी काहीच पडलेले नाही. धैर्यशील अनपट आणि बापूराव जाधव यांनी वरिष्ठांपर्यंत इच्छा बोलून दाखविली. मात्र, पदरी काहीच पडले नाही. येत्या काळात अनेक संस्थांच्या निवडणुका आहेत. त्याचबरोबर सभापतिपदासाठी इच्छुकही वाढल्याने वरिष्ठांनी सभापतिपदे न बदलण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अनपट आणि जाधव समर्थकांत नाराजी आहे.
चौकट :
दिलेला शब्द कधी खरा होतो का ?
वर्षभरापूर्वी दावेदारांना नेत्यांनी सभापतिपद देण्याचा शब्द दिला होता. यावरच इच्छुक अडून बसले होते. आपण वर्षांनंतरतरी सभापतीच्या खुर्चीवर बसू अशी त्यांची धारणा झालेली. पण, परिष्ठांच्या निर्णयाने त्यांच्या सर्व इच्छांवर पाणी पडलेले आहे, तर मागीलवर्षी सभापती निवडीवेळी एका इच्छुकाने दिलेला शब्द कधी खरा होतो का ? असा सवाल पत्रकारांसमोर उपस्थित केला होता. तो खरा होताना दिसून आला. त्यामुळे राजकारणात कोणाचेही काही खरे नसते हे पुन्हा दिसून आले.
...........................................................