मताधिक्य नव्हे; आता कामच बोलेल!
By Admin | Updated: November 11, 2014 00:03 IST2014-11-10T20:42:18+5:302014-11-11T00:03:34+5:30
शिवेंद्रसिंहराजे : पोस्टमॉर्टेम न करता नाराजी दूर करेन

मताधिक्य नव्हे; आता कामच बोलेल!
सातारा : ‘मी कधीही मताधिक्याची अपेक्षा ठेवून निवडणूक लढवली नाही. जनतेचा कौल मी स्वीकारला आहे. झाले गेले विसरून नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी माझ्या परीने कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे ‘साविआ आणि नविआ’ या दोन्ही आघाड्यांतील नगरसेवकांनी निवडणुकीत कोण कमी पडले आणि कोणी मताधिक्य दिले या चर्चेच्या गुऱ्हाळात न अडकता विकासकामांकडे लक्ष द्यावे,’ असा सल्ला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे की, ‘२००९ च्या निवडणुकीत मला विक्रमी मते मिळाली होती. सातारा शहरात मला यंदा कमी मते मिळाली; मात्र जनतेचा कौल मी मान्य केला असून, शहरातील समस्या सोडवून मी नागरिकांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मला मताधिक्य मिळाले नाही.
कोणी काम केले, कोणी केले नाही, मला कमी मते मिळाली का जास्त मिळाली यावर कोणी चर्चा करावी, असे मला वाटत नाही. हा विषय आता कालबाह्य झाला असून, या विषयापेक्षा मी कामाला महत्त्व देतो. त्यामुळे दोन्ही आघाड्यांतील नगरसेवकांनी चुका सुधारून जोमाने कामाला लागावे,’ (प्रतिनिधी)
विकासासाठी हातभार लावा
कोणाकडून काय चुका झाल्या, हे ज्याचे त्याला माहीत आहे. त्यामुळे झालेल्या गोष्टींचे भांडवल करून या चुका सुधारणार आहेत का? याचा विचार सर्वांनी केला पाहिजे. माझ्या मताधिक्यासाठी कोण झटलं आणि कोण कमी पडलं या चर्चेत अडकण्यापेक्षा सर्वांनी साताऱ्याच्या विकासासाठी हातभार लावणे गरजेचे आहे.