सत्ता घेऊन कोणी जन्माला येत नाही
By Admin | Updated: January 21, 2015 23:53 IST2015-01-21T20:53:49+5:302015-01-21T23:53:40+5:30
सभासद नोंदणी अभियान : रामराजे नाईक-निंबाळकर यांचे प्रतिपादन

सत्ता घेऊन कोणी जन्माला येत नाही
फलटण : ‘लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांची वाताहात झाली आहे. १५ वर्षे सत्तेत राहूनही आज आपण विरोधामध्ये बसलो आहोत. राजकारणात उलथापालथ यापूर्वीही झाली होती; परंतु नंतर पक्ष सावरले. सत्ता घेऊन कोणीही जन्माला येत नाही, तरी देखील सध्याच्या परिस्थितीत समाजात तरुण वर्गाची ताकद मोठी आहे. त्यांना विश्वासात घेऊन पुढे जावे लागेल,’ असे प्रतिपादन आमदार रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तालुक्यातील सभासद नोंदणी अभियान कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार डॉ. कृष्णचंद्र भोईटे, आमदार दीपक चव्हाण, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, सुभाषराव शिंदे, डॉ. विजयराव बोरावके, श्रीरामचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, माजी चेअरमन महादेवराव पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
विजयसिंह मोहिते-पाटील म्हणाले, ‘सरकार बदलले तरी सर्व आघाड्यांवर अपयश येताना दिसत आहे. दूध, धान्य याचे बाजारभाव पडले आहेत. उसाच्या दराचा प्रश्न लोंबकळत ठेवला आहे. त्यामुळे लोकांची नाराजी वाढत आहे. सभासद नोंदणी अभियानामध्ये कार्यकर्त्यांनी सक्रिय राहावे, असे आवाहन त्यांनी केले.’ यावेळी उपस्थित मान्यवरांचे हस्ते भिवा पोकळे, दत्तोबा शिंदे, नीलेश कदम, प्रवीण रसाळ, मंगेशशेठ दोशी, डॉ. मधुकर माळवे, मीनाबाई ठोंबरे यांना सभासद नोंदणी पुस्तके प्रदान करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)