टोल माफी नाहीच...मासिक पासवरच मिळवा टोलमाफीचे समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:36 AM2021-03-07T04:36:25+5:302021-03-07T04:36:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क टोलमाफी करण्यावरून राजकीय नेत्यांनी गत सप्ताहात मोठे रान उठविले. टोलमाफी करणाऱ्या नेत्याच्या पाठीशी काही लोकप्रतिनिधींनी स्वत:ची ...

No toll waiver ... Get the solution of toll waiver only on monthly pass | टोल माफी नाहीच...मासिक पासवरच मिळवा टोलमाफीचे समाधान

टोल माफी नाहीच...मासिक पासवरच मिळवा टोलमाफीचे समाधान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

टोलमाफी करण्यावरून राजकीय नेत्यांनी गत सप्ताहात मोठे रान उठविले. टोलमाफी करणाऱ्या नेत्याच्या पाठीशी काही लोकप्रतिनिधींनी स्वत:ची ताकद, तर काहींनी पक्षाची ताकद उभी करण्याचे नियोजन केले. पण, तांत्रिक बाबी पाहिल्यानंतर टोलमाफी होऊच शकत नाही, ही बाब समोर आली आहे. त्यामुळे नेत्यांचे काही काळाचे राजकारण झाले असले तरी सर्वसामान्यांची टोलमधून सुटका झालेली नाही. टोल नाक्यापासून २० किलोमीटर हवाई अंतरात असणाऱ्या लोकांनी मासिक पास काढून काही प्रमाणात टोलमाफीचे समाधान मिळवावे, एवढेच आपल्या हातात राहिले आहे.

पुणे जिल्ह्याला टोलमाफी मिळाली, मग आपल्याला का नाही...असा टाहो फोडत काहीजण रस्त्यावर उतरले. पण, पुणे जिल्ह्याला आंदोलनामुळे माफी मिळाली, काही नियम आणि तरतुदींमुळे मिळाली का त्याचे आणखी काय वेगळे कारण आहे, हे शोधण्याचा कोणी प्रयत्नच केला नाही. नुकत्याच खासदार महोदयांच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार सातारा आणि कऱ्हाडकरांना टोलमाफी देता येणार नाही अशा प्रकारचा निर्णय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगून टाकला आणि आपल्या लोकप्रतिनिधींनी तो ऐकून घेतला. केवळ २० किलोमीटरच्या हवाई हद्दीमध्ये असलेल्या लोकांना मासिक पासच्या माध्यमातून टोलमध्ये सवलत आहे. एवढा एकच पर्याय या बैठकीमध्ये सुचविण्यात आला. त्यामुळे तोच पर्याय सध्यातरी नियमित प्रवास करणाऱ्या सातारकरांसाठी उपयोगाचा असणार आहे.

टोलमाफी करून दाखवा, आम्ही पाठीशी आहोत असे सांगणाऱ्या नेत्यांना बहुतेक याची पूर्वीच माहिती असावी. त्यामुळे त्यांनी एकमेकांकडे बोटे दाखविण्याचे काम केले. पण, पहले तुम, पहले तुम करीत असताना सगळेच मागे राहिले याचाही विचार होणे गरजेचे आहे. टोलमध्ये काय तरतुदी आहेत त्याचा अभ्यास करून त्या कशा बदलता येतील याचाही विचार होऊ शकतो. त्याबाबत कोणीही अभ्यास करायला का तयार नाही.

कोल्हापूर शहरामध्येही असाच टोल आकारण्यात आला होता. रस्ते तयार करण्यात आले, टोल नाके उभारण्यात आले. हे टोल नाके घेण्यासाठी जे टोल नको म्हणत होते, त्यातीलच काहीजण आघाडीवर होते. तरीही एन. डी. पाटील, दिवंगत सदाशिवराव मंडलिक, गोविंदराव पानसरे या नेत्यांच्या रेट्यापुढे कोणाचेच काही चालले नाही. सर्व कोल्हापूरकर रस्त्यावर आले. टोलनाके जागेवर पेटविण्यात आले. तेवढी ताकद या नेत्यांनी उभी केली होती. सर्व कोल्हापूरकर या नेत्यांच्या पाठीशी उभे राहिले होते. त्यासाठी अंतरिक भावना जागृत होण्याची आवश्यकता आहे. तशीच एकी सातारा आणि कऱ्हाडमधील लोकांनी दाखविण्याची आवश्यकता आहे.

चौकट

सातारकरांच्या जनआंदोनलाची गरज

कोणीतरी मसिहा येईल आणि माझे प्रश्न सोडवेल अशी अपेक्षा बाळगून उपयोगाचे नाही. त्यासाठी सातारकरांनी आता स्वत:च प्रयत्न करायला हवे आहेत. नेत्यांच्या मागे रेटा लावण्याची आवश्यकता आहे. प्रत्येकाने आपल्या नेत्याला टोलबाबत सतत विचारणा केली तर नेत्यांनाही फार काळ हा प्रश्न झुलवत ठेवता येणार नाही. पण, त्यासाठीही सामाजिक भान असलेले नेते पाहिजे आहेत. जसे कोल्हापुरात एक टोलविरोधी चळवळ उभी राहिली. दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणींची त्यांना जाणीव झाली. त्यामुळेच सगळे पेटून उठले आणि टोलनाके पेटविले. तशीच अस्मिता सातारकरांनी दाखविली पाहिजे.

चौकट -

टोलमुळे होते कुटुंबीयांचीही ताटातूट

सातारकरांचे आणि कऱ्हाडकरांचेही या टोलला तीव्र विरोध नसण्याचे कारण म्हणजे रोज टोलचा सामना करावा लागत नाही. आठवड्यातून किंवा पंधरा दिवसांतून सातारा आणि कऱ्हाड बाहेर जाणाऱ्या लोकांना त्याची तीव्रता तेवढी जाणवत नाही. दर आठवड्याला पुण्याहून साताऱ्याकडे येणाऱ्या लोकांना किंवा कऱ्हाडला जाणाऱ्यांना एकावेळी दोन ते तीन टोल नाक्यांवर टोल भरावा लागतो. केवळ टोल भरावा लागतो म्हणून पुण्यातून घराकडे येण्याचेही टाळले जाते. त्यामुळे होणारी कुटुंबाची ताटातूट हा तर वेगळाच विषय आहे.

Web Title: No toll waiver ... Get the solution of toll waiver only on monthly pass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.