मास्तरांमध्ये नो भरती, ओन्ली सेवानिवृत्ती!
By Admin | Updated: October 13, 2015 00:03 IST2015-10-12T22:32:39+5:302015-10-13T00:03:19+5:30
शासनाच्या धोरणाचा फटका : बदलीचे प्रस्तावही प्रशासनाकडे धूळखात पडून--शाळाबाह्य गुरुजी : दोन

मास्तरांमध्ये नो भरती, ओन्ली सेवानिवृत्ती!
प्रगती जाधव-पाटील -- सातारा भरती प्रक्रियेत असणाऱ्या अस्थिरतेमुळे प्रतिभासंपन्न विद्यार्थ्यांनी शिक्षक होण्यापासून स्वत:ला दूर ठेवले आहे. तर भरतीच्या मंदावलेल्या अवस्थेमुळे मास्तरांमध्ये ‘नो भरती... ओन्ली सेवानिवृत्ती’ अशी अवस्था झाली आहे. सोयीच्या ठिकाणी बदली घेण्याचे अधिकार स्थानिक पातळीवरून काढून घेतल्याने बदलीचे हजारो प्रस्ताव प्रशासकीय कार्यालयात पडून आहेत.प्रादेशिक दुय्यम सेवा मंडळाच्या बरखास्तीनंतर शिक्षक भरतीचे पर्याय शासन शोधू लागले. त्यासाठी आर्थिक कारण दाखवून शिक्षण सेवक पदाची निर्मिती, वस्ती शाळा, अनग्रेड शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. यामुळे प्रचंड अस्थितरता निर्माण झाली. एकाच शाळेत अनग्रेड, शिक्षण सेवक आणि पूर्णवेळ शिक्षक एकत्रिक काम करू लागल्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणावर प्रश्नचिन्ह उभे राहिले. कधी ‘सीईटी’ तर कधी स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून शिक्षकांची होणारी बदली अनेकांना बुचकळ्यात टाकू लागली. यामुळे अनेकांनी शिक्षण क्षेत्राकडे पाठ फिरविली.
पूर्वी वर्षातून एकदा भरती प्रक्रिया सुरू असायची. आता मात्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे वर्षोनुवर्षे भरती प्रक्रियाच झालेली नाही. यामुळे शैक्षणिक कामांबरोबरच अशैक्षणिक कामांचा ताणही उपलब्ध संख्येतील शिक्षकांवरच पडू लागला आहे.
अलिकडे प्रशासकीय बदल्यांचा अध्यादेश आल्यापासून तर बदली प्रक्रिया पूर्णपणे थांबली आहे. रोष्टर, शाळेचा कमी झालेला पट, न्यायालयीन याचिका, शासनाचे बदल्यांबाबतचे बदलणारे धोरण यामुळे शिक्षकांच्या बदल्या ठप्प आहेत.
गेल्या दोन वर्षांत विशेष बाब म्हणून जिल्ह्यात केवळ एखादीच बदली झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
असे आहेत बदल्यांचे प्रकार
प्रशासकीय बदली : ज्या शिक्षकाच्या नियुक्तीला पाच वर्षे पुर्ण झाली आहेत, तो शिक्षक बदलीस पात्र असतो.
पती-पत्नी एकत्रीकरण : पती पत्नी असलेल्या शिक्षकांना एकाच शाळेत नियुक्ती मिळावी असा आदेश आहे. पण पट संख्या आणि शाळेत शिक्षकांचा कोटा पूर्ण असेल तर तिथे पती पत्नी एकत्र नाहीत.
समायोजन : ज्या शाळांमध्ये १५१ पेक्षा पटसंख्या कमी आहे, अशा शाळांमधील शिक्षकाची बदली इतरत्र केली जाते. त्यामुळे शिल्लक राहिलेल्या शिक्षकांवर कामाचा ताण येतो.
पदाधिकाऱ्यांचे बदल : अर्थपूर्ण लाभासाठी पूर्वी स्थानिक पातळीवर पदाधिकारी आणि राजकीय नेते शिक्षकांच्या बदलीसाठी सक्रिय सहभाग नोंदवायचे. आता स्थानिक पातळीवरील हे अधिकार काढून घेतल्यामुळे शिक्षकांच्या बदल्यांचा विषय कोणाच्याही गावी नाही.
जिल्हा बदली : हजारो तरूण नोकरीच्या शोधात शिक्षक सेवक म्हणून राज्यात विविध ठिकाणी शिक्षण सेवा बजावत असतात. आपला जिल्हा सोडून डोंगरदऱ्या आणि दुर्गम भागात काम करणाऱ्या या शिक्षकांना आपल्या जिल्ह्यात येण्याची आस असते.
गेल्या अनेक वर्षांत शिक्षकांची भरती न झाल्यामुळे शैक्षणिक आणि अशैक्षणिक कामांचा ताण शिक्षकांवर पडला आहे. त्याचा परिणाम अध्ययन करणाऱ्यावर होत आहे. अभ्यासक्रम पूर्ण करायचा का शासनाने सोपवलेली अशैक्षणिक कामे करायची, अशा कात्रीत शिक्षक सापडले आहेत.
- महेश सुतार,
मांटीमुरा, जि.प. शाळा, सातारा