तळ्यात नकोय ‘राजकीय प्रदूषण’!
By Admin | Updated: June 25, 2014 00:30 IST2014-06-25T00:24:52+5:302014-06-25T00:30:51+5:30
नागरिकांचा उद्वेग: विसर्जनप्रश्नी सहा महिन्यांपूर्वी पत्रव्यवहार करूनही जिल्हा प्रशासनाच्या डोळ्यावर पट्टी

तळ्यात नकोय ‘राजकीय प्रदूषण’!
सातारा : मंगळवार तळ्यातलं पाणी अनायसे उपसलंच आहे. पाऊसही लांबला आहे. त्यामुळं मोठ्या मूर्ती आजमितीस विसर्जन करायच्या झाल्यास शक्यच नाही. तळ्याची हीच पाणीपातळी गणेशोत्सवापर्यंत कायम ठेवावी. तसेच ‘दुर्गंधीमुक्तीच्या मोहिमेत राजकीय प्रदूषण नको’ अशी उद्विग्न प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत. विसर्जन आणि त्यामुळं होणाऱ्या प्रदूषणाबद्दल सहा महिन्यांपूर्वी पत्रव्यवहार करूनही प्रशासनानं वेळीच हालचाली केल्या नाहीत, याचा संताप नागरिकांच्या बोलण्यातून जाणवतो.
मोती तळ्यात विसर्जनबंदी केल्यानंतर मंगळवार तळ्यावर अतिरिक्त भार पडून प्रदूषणाने धोक्याची पातळी गाठली आहे. तळ्याची धारणक्षमताही विचारात न घेता विसर्जित केलेल्या प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तींचे भग्नावशेष उघड्या डोळ्यांनी पाहणं आणि नाक मुठीत धरून जगणं नागरिकांच्या वाट्याला आलंय. ‘लोकमत’ने हा विषय हाती घेताच परिसरातील नागरिकांनी मुक्तपणे मते मांडण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी एका इमारतीच्या ‘पार्किंग’मध्ये नागरिकांनी मनातली खदखद ‘लोकमत’ टीमसमोर मोकळी केली. असं एका सुरात लोक म्हणू लागलेत. वेगवेगळे जनसमूह एकत्रित येऊन याप्रश्नी मार्ग काढण्यास पुढं येऊ लागलेत.
यावर्षी मासे मृत्युमुखी पडू लागल्यावर यांत्रिक मार्गानं पाणी उपसलं गेलं. या प्रक्रियेत परिसरात झालेल्या प्रदूषणामुळं नागरिक आजारी पडलेच; शिवाय घरातली तांब्या-पितळेची भांडी, चांदीचे अलंकार, इतकंच काय देवघरातले देवही काळे पडले. पावसामुळं हळूहळू पाणी वाढू लागलं असलं, तरी नागरिकांना तळं भरूच नये, असं मनापासून वाटतंय. मोठ्या गणेशमूर्ती आणि दुर्गामूर्तींच्या विसर्जनास सावत्रिक विरोध असल्याचं त्यांच्या बोलण्यातून जाणवतं. गेल्या चार महिन्यात या प्रश्नाचे चटके जवळजवळ प्रत्येकाने सोसले असल्यामुळे प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी श्रमदानापासून काहीही करण्याची तयारी नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना दाखविली.
(लोकमत टीम)