ना फिजिकल डिस्टन्स, ना मास्क; विद्यार्थ्यांना सांभाळणं अवघड टास्क!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:19 IST2021-02-05T09:19:00+5:302021-02-05T09:19:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकांनी थोडी धास्ती घेऊन विद्यार्थ्यांना शाळेत पाठवलं. मात्र, पाचवी, सहावीच्या विद्यार्थ्यांना सांभाळणं ...

ना फिजिकल डिस्टन्स, ना मास्क; विद्यार्थ्यांना सांभाळणं अवघड टास्क!
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकांनी थोडी धास्ती घेऊन विद्यार्थ्यांना शाळेत पाठवलं. मात्र, पाचवी, सहावीच्या विद्यार्थ्यांना सांभाळणं हा शिक्षकांसाठी अवघड टास्क बनला आहे. शासनस्तरावर शाळा सुरू करण्याचे आदेश दिल्याने विद्यार्थी उत्साहात शाळेत आले खरे; पण मास्क आणि सोशल डिस्टन्स याचा त्यांना विसर पडला आहे.
कोविडचा वाढता प्रसार लक्षात घेता, मार्च २०२० मध्ये शाळा बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर सुमारे दहा महिन्यांनंतर नववी ते बारावी आणि आता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शासनाने अनलॉक प्रक्रियेत घेतला. विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यापूर्वी कोविडची चाचणी यासह पालकांचे संमतीपत्रही शाळेला देणं बंधनकारक करण्यात आले.
विद्यार्थ्यांना पाठवताना पालकांनी घरी आणि शिक्षकांनी शाळेत आल्यानंतर घ्यावयाच्या उपाययोजनांची माहिती विद्यार्थ्यांना दिली, पण दहा महिन्यानंतर मित्रमंडळी भेटल्याने विद्यार्थ्यांना याचा विसर पडला. त्यातही वर्गामध्ये शिक्षकांकडून याची दक्षता घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे चित्र दिसते.
कोट :
विद्यार्थ्यांचे वर्तन वर्गात कसे असावे, याची माहिती आम्ही त्यांना दिली आहे. मात्र, वर्गात येताना किंवा बाहेर जाताना त्यांच्याकडून काहीवेळा मास्क खाली घेणे किंवा सोशल डिस्टन्स न पाळण्याचे प्रकार होतात.
- श्रध्दा पाटील, शिक्षिका
सोशल डिस्टन्सिंगबाबतचे नियम आम्ही वारंवार विद्यार्थ्यांना सांगतोय; पण शाळेत येतानाच एकमेकांच्या खांद्यावर हात टाकलेल्या विद्यार्थ्यांना सांभाळणे कठीण जातेय. यासाठी पालकही सहकार्य करत आहेत.
- राजेश बोराटे, शिक्षक
खूप दिवसांनी शाळेत आलेले विद्यार्थी अद्यापही उत्साहित आहेत. कोविडविषयी त्यांना गरजेएवढी माहिती आहे. उत्साहात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाकडे दुर्लक्ष होते; पण मास्क सगळेच वापरतात.
- हसिना मुलाणी, शिक्षिका
एकूण शाळा : १०६९
विद्यार्थी उपस्थिती : ४६६६
शिक्षक उपस्थिती : ४९४१