मोबाईल सेवा देईना, कुठलंच काम होईना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:42 IST2021-03-09T04:42:05+5:302021-03-09T04:42:05+5:30

पुसेगाव : जांब, जाखणगाव व आसपासच्या वाड्या-वस्त्या, तसेच पुसेगाव व परिसरातील ग्रामस्थांना मोबाईल रेंज व इंटरनेट सेवेसाठी धावाधाव करावी ...

No mobile service, no work! | मोबाईल सेवा देईना, कुठलंच काम होईना!

मोबाईल सेवा देईना, कुठलंच काम होईना!

पुसेगाव : जांब, जाखणगाव व आसपासच्या वाड्या-वस्त्या, तसेच पुसेगाव व परिसरातील ग्रामस्थांना मोबाईल रेंज व इंटरनेट सेवेसाठी धावाधाव करावी लागत आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, तसेच बँकेत जाणारे ग्राहक, वर्क फ्रॉम होम करणारे नोकरदार, रेशनिंग दुकानदार व मोबाईल सेवेचे लाभार्थी मोबाईल सेवेला अक्षरशः वैतागले आहेत.

गावात कोणत्याही मोबाईल कंपनीची रेंज व्यवस्थित नाही. काॅल न लागणे, काॅल मध्येच बंद पडणे, समोरच्या व्यक्तीचा आवाज ऐकू न येणे अशा एक ना अनेक समस्येमुळे ग्राहक संताप व्यक्त करीत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या सर्व प्रकारच्या ऑनलाईन सेवेत प्रचंड व्यत्यय निर्माण होत आहेत. शालेय विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणासह ग्रामपंचायतीच्या शासकीय कामकाजावर परिणाम होतोय. त्यामुळे पैसे देऊन येथील ग्राहकांचा छळ सुरू असून, संबंधित कंपन्यांनी रेंज व इंटरनेट सेवा सुरळीत करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी जांब (ता. खटाव) चे माजी सरपंच चंद्रकांत शिंदे यांनी केली आहे.

खटावच्या पश्चिमेला अंतरावर डोंगराळ भागात जवळपास सहा ते सात लहान-मोठी गाव वसलेली आहेत. सर्व गावांची मिळून जवळपास सात ते आठ हजारांवर लोकसंख्या आहे. मात्र, संपर्काची आधुनिक सुविधा मिळत नसल्याने गावकऱ्यांना रेंज वा नेटवर्कसाठी एखाद्या उंच घराचा, झाडाचा वा दोन किलोमीटर गावाबाहेर जिथं रेंज असेल, अशा ठिकाणचा सहारा घ्यावा लागत आहे. एकीकडे पंतप्रधान डिजिटलायझेशन, ऑनलाईन बँकिंग, ऑनलाईन योजनांसाठी आवाहन करीत असताना या भागात नेटवर्कअभावी डिजिटल योजनेचा बोजवारा उडाला आहे. जांब, बिटलेवाडीसारख्या गावात रेशनिंग वाटप करणाऱ्या विक्रेत्यांना ऑनलाईन थंब इंम्प्रेशनसाठी गावाबाहेर उंच ठिकाणी वा गावातील उंच इमारतीचा सहारा घ्यावा लागतो. दोन वर्षांपूर्वी एका कंपनीने या भागाचा सर्व्हे करून टॉवर उभारणीच्या कामाला सुरुवात; पण केली होती. त्याप्रमाणे डीपी उभारून टॉवरसाठी खड्डा काढून बांधकामाला सुरुवातही केली होती.

चौकट...

मोबाईल रेंजसाठी घराच्या घतावर..

या भागातील ग्रामस्थ मोबाईलच्या रेंजसाठी मोबाईल घराच्या छतावर, भिंतीवर ठेवत आहेत; पण त्यातही वानरांचा धोका असतोच. सर्वांत जास्त तोटा शालेय विद्यार्थ्यांना होत आहे. या भागातील ग्रामस्थ मोबाईलच्या रेंजसाठी मोबाईल घराच्या छतावर, भिंतीवर ठेवत आहेत; पण त्यातही वानरांचा धोका असतोच. सर्वात जास्त तोटा शालेय विद्यार्थ्यांना होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांची नेटवर्कअभावी कोंडी झालीय. बरेचसे विद्यार्थ्यांना मोबाईल घेऊन शेतात जाऊन बसावे लागते वा उंच इमारतीचा सहारा घ्यावा लागतो. याशिवाय नोकरीनिमित्त पुण्या-मुंबईला असलेले आयटीमध्ये काम करणारे युवक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावी येऊन वर्क फ्रॉम होम करीत आहेत. मात्र, त्यांनाही गावी येऊन आगीतून उठून फोफाट्यात पडल्यासारखे वाटू लागले आहे. त्यामुळे या परिसरातील लोकांच्या मोबाईल नेटवर्क व रेंजच्या संदर्भात संबंधित कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांनी व तालुका प्रशासनाने दखल घेऊन ग्राहकांची गैरसोय टाळावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शिंदे यांनी दिला.

०८पुसेगाव

फोटो: जांब (ता. खटाव) येथे मोबाईलची रेंजच येत नसल्याने शालेय विद्यार्थ्यांना घराच्या गच्चीवर उन्हात अभ्यास करावा लागत आहे. ( छाया : केशव जाधव)

Web Title: No mobile service, no work!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.