कितीही कारवाई करा... आपला रस्ताच बरा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:12 IST2021-02-06T05:12:37+5:302021-02-06T05:12:37+5:30
सातारा : भाजी विक्रेत्यांसाठी सातारा शहरात चार प्रशस्त मंडया असताना अनेक शेतकऱ्यांचा आठवडी नव्हे तर दैनंदिन बाजारही रस्त्यावरच भरत ...

कितीही कारवाई करा... आपला रस्ताच बरा !
सातारा : भाजी विक्रेत्यांसाठी सातारा शहरात चार प्रशस्त मंडया असताना अनेक शेतकऱ्यांचा आठवडी नव्हे तर दैनंदिन बाजारही रस्त्यावरच भरत आहे. रस्त्यावरील हा बाजार आता वाहनधारकांसह प्रशासनाची डोकेदुखी वाढवू लागला आहे. ‘तुम्ही कितीही कारवाई करा; पण आपला रस्ताच बरा,’ असा सूर भाजी विक्रेत्यांमधून आळवला जात आहे.
इतर शहरांच्या तुलनेत साताऱ्याची बाजारपेठ सर्वांत मोठी आहे. त्यामुळे शहरी तसेच ग्रामीण भागांतील शेतकरी व नागरिकांची या ठिकाणी खरेदी-विक्रीसाठी सतत लगबग सुरू असते. नागरिकांच्या सोयीसाठी पालिकेने शहरात राजवाडा, जुना मोटार स्टँड, पोवई नाका व बाजार समिती येथे भाजी मंडईची उभारणी केली आहे. प्रत्येक मंडईत जवळपास दीडशे ते दोनशे शेतकऱ्यांसाठी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. तरीही रस्त्यावर निर्धास्तपणे भाजी विक्री करणाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे.
राजवाडा मंडईत जागा असूनही अनेक विक्रेते राजवाडा ते मंगळवार तळे या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा भाजी विक्री करतात. महात्मा फुले भाजी मंडई आठवडे बाजारादिवशी भरून जाते. मात्र इतर दिवशी मंडईत शुकशुकाट असतो. तरीही बहुतांश विक्रेते मंडईच्या बाहेर रस्त्यावरच भाजी विक्रीसाठी बसतात. पोवई नाका व बाजार समितीच्या परिसरातही काहीअंशी अशीच परिस्थिती आहे. मंडई असतानादेखील रस्त्यावर भाजी विक्री केली जात असल्याने शहरातील रस्ते भाजी विक्रेत्यांसाठी आहेत की वाहतुकीसाठी, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे. पालिकेकडून अशा विक्रेत्यांवर सातत्याने कारवाई केली जात आहे. मात्र काही दिवसांत परिस्थिती जैसे थे होत असल्याने आता प्रशासनही हतबल झाले आहे.
(चौकट)
रस्त्यावरील मंडईची ठिकाणे
बसस्थानक परिसर, बाजार समिती, राधिका रोड, जुना मोटार स्टँड, चांदणी चौक, मंगळवार तळे मार्ग, गोडोली चौक, शाहूपुरी चौक, मोळाचा ओढा ते कोंडवे मार्ग.
(चौकट)
.. म्हणे ग्राहकच येत नाहीत!
ग्राहकांना रस्त्यावरून भाजी खरेदी करणे सोयीचे पडते. एका ठिकाणी गाडी लावून मंडईत चालत जाणे व भाजी खरेदी करणे अनेकांना वेळखाऊ वाटते. त्यामुळे अनेकजण येता-जाता भाजी खरेदी करतात; तर मंडईत ग्राहक फिरकत नसल्याने धंदा होत नाही. त्यामुळे रस्त्यावर बसून भाजी विक्री करण्याखेरीज दुसरा पर्यायच नाही, अशी धारणा भाजीविक्रेत्यांची झाली आहे.
(चौकट)
या ठिकाणी होऊ शकते व्यवस्था
- मंगळवार तळे मार्गावर भाजी व फळविक्रेत्यांचे प्रतापसिंह भाजीमंडईतील दुसºया मजल्यावर पुनर्वसन होऊ शकते.
- बाजार समितीचा परिसर व राधिका रस्त्यावर भरणाऱ्या भाजी मंडईसाठी प्रशासनापुढे हजेरी माळ व तहसील कार्यालयाजवळील हॉकर्स झोनसाठी निश्चित केलेल्या जागेचा तात्पुरता पर्याय आहे.
- महात्मा फुले भाजी मंडई आठवडा बाजाराच्या दिवशी गजबजून जाते. इतर दिवशी रस्त्यावरील सर्व भाजी व फळविक्रेत्यांचे या मंडईत स्थलांतर केल्यास येथील रस्ता पुन्हा मोकळा होऊ शकतो.
लोगो : रस्त्यावरचा आठवडे बाजार
फोटो : ०४ जावेद ०४,०६,०७
सातारा शहरात प्रशस्त भाजी मंडई असतानाही भाजी विक्रेत्यांकडून रस्त्यावर बसूनच भाजी विक्री केली जात आहे. (छाया : जावेद खान)