शेतीसाठी पाणी देण्याचा ठराव झालाच नाही!

By Admin | Updated: March 31, 2016 00:01 IST2016-03-30T22:29:31+5:302016-03-31T00:01:48+5:30

सवादे : म्हणे... ‘ते’ पत्रक खोटे; कोऱ्या कागदावर घेतली सही, संभ्रमावस्था निर्माण

No decision to give water to agriculture! | शेतीसाठी पाणी देण्याचा ठराव झालाच नाही!

शेतीसाठी पाणी देण्याचा ठराव झालाच नाही!

कऱ्हाड : सवादे, ता. कऱ्हाड येथील सार्वजनिक विहिरीचे पाणी शेतीला दिल्याच्या कारणावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. गावविहिरीचे पाणी शेतीला दिल्याबाबतचे निवेदन शनिवारी ग्रामस्थांनी दिले होते तर रविवारी उपसरपंच संजय शेवाळे यांनी सरपंच लिलाबाई कांबळे यांच्या सहीने हा निर्णय बैठकीतच झाल्याचे पत्रक दिले. मात्र, त्यानंतर सरपंच कांबळे यांनी गावविहिरीचे पाणी शेतीला देण्याचा कोणताही ठराव झाला नव्हता, असे पत्रक काढल्याने या प्रकारातील गुंता अधिकच वाढला आहे. सरपंच कांबळे यांचे नेमके खरे पत्रक कोणते, याबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे.
सवादे येथील सार्वजनिक विहिरीतील पाणी उपसरंपच संजय शेवाळे स्वत:च्या शेतीसाठी वापरत आहेत. हा सत्तेचा गैरवापर असल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी तहसीलदार, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने दिली. मात्र उपसरपंच शेवाळे यांनी दुसऱ्या दिवशी रविवारी याचा तातडीने खुलासा करीत त्या विहिरीतील पाणी गेल्या दोन वर्षांपासून वापरात नव्हते. ते खराब पाणी इतरत्र सोडण्यापेक्षा शेतीसाठी भाडेतत्त्वावर देण्याचा ठराव २३ मार्चच्या ग्रामपंचायत बैठकीत घेतला असल्याचे सांगत विरोधकांचा प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून खरपूस समाचार घेतला. त्याचवेळी सरपंच लिलाबाई कांबळे यांच्याही सहीचे एक पत्रक त्यांनी माध्यमांना दिले. त्यामध्ये सरपंच कांबळे यांनी अशुद्ध पाणी शेतीस असे बैठकीत ठरविण्यात आले, असे म्हटले आहे.
दरम्यान, सरपंच कांबळे यांचे ग्रामपंचायतीच्या लेटरहेडवर दि. २८ रोजी पुन्हा एक प्रसिद्धी पत्रक माध्यमांच्या हाती पडले. त्यामध्ये यापूर्वी प्रसिद्ध केलेले पत्रक हे खोटे असून, ‘ग्रामसेवक माळी, उपसरपंच संजय शेवाळे यांनी येडूदेव साठे या शिपायाला माझ्याकडे पाठवून विकासकामांसाठी प्रस्ताव पाठवायचा आहे,’ असे सांगून कोऱ्या कागदावर माझी सही घेतल्याचे पत्रकात म्हटले आहे.
शेतीला पाणी देण्याचा ठराव झाला नव्हता. ग्रामसेवक व उपसरपंच यांच्या संगनमताने मागील तारखेला मासिक सभेत ठराव घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे. यापूर्वीही ग्रामसेवक व उपसरपंच यांच्या मनमानी कारभाराबद्दल तक्रार केली आहे. त्यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)


खरे काय...खोटे काय याबाबत संभ्रम
२७ मार्च रोजी सरपंच कांबळे यांनी प्रसिद्धीला दिलेले पत्रक हे कोऱ्या कागदावर असून, त्यावर खाली सरपंचांची सही व शिक्का दिसतो आहे. तर २८ मार्च रोजी सरपंच कांबळे यांनी प्रसिद्धीस दिलेले पत्रक ग्रामपंचायतीच्या अधिकृत लेटरपॅडवर सही शिक्क्यानिशी आहे त्यामुळे खरे काय आणि खोटे काय याबाबत पंचक्रोशीतील ग्रामस्थांमध्ये गोंधळ वाढला आहे.

Web Title: No decision to give water to agriculture!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.