नितीन गडकरींसह मान्यवर आज कऱ्हाडात
By Admin | Updated: March 25, 2016 23:32 IST2016-03-25T20:53:33+5:302016-03-25T23:32:40+5:30
कृष्णा विद्यापीठात दीक्षांत सोहळा : ४२६ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान होणार

नितीन गडकरींसह मान्यवर आज कऱ्हाडात
कऱ्हाड : येथील कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाचा पाचवा दीक्षांत सोहळा दि. २६ मार्च रोजी सकाळी दहा वाजता विद्यापीठाच्या प्रांगणात आयोजित केला आहे. यास प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय रस्तेवाहतूक आणि जहाजमंत्री नितीन गडकरी, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले उपस्थित राहणार आहेत.
अध्यक्षस्थान विद्यापीठाचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा भूषविणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे आणि परीक्षा नियंत्रक डॉ. आर. के. गावकर यांनी दिली.
कृष्णा अभिमत विद्यापीठात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
डॉ. घोरपडे म्हणाले, ‘शनिवारी आयोजित करण्यात येणाऱ्या दीक्षांत समारोहाला कृष्णा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ए. व्ही. नाडकर्णी, आरोग्यविज्ञान संचालक डॉ. आर. के. अयाचित आदी मान्यवरांसह व्यवस्थापन मंडळाचे सदस्य आणि अभ्यास मंडळाचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात विद्यापीठाच्या विविध अधिविभागातील ४२६ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे.’
कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या कृष्णा वैद्यकीय विज्ञान संस्थेची स्थापना ग्रामीण भागातील जनतेला मोफत व माफक दरात उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आरोग्य शिक्षण मिळावे, या उद्देशाने करण्यात आली.
दिवंगत जयवंतराव भोसले यांची दूरदृष्टी आत्मसात केलेल्या डॉ. सुरेश भोसले यांची प्रथम कृष्णा वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या अभिमत विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड करण्यात आली. या दीक्षांत समारंभात ४२६ विद्यार्थी-विद्यार्थिनींना पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. विशेष गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)