नव्वद टक्के बटाट्याचे बियाणे बोगस
By Admin | Updated: November 27, 2014 00:24 IST2014-11-26T22:38:26+5:302014-11-27T00:24:11+5:30
पुसेगावात खळबळ : बाजारपेठेतून विक्री झालेल्या बियाण्याची तज्ज्ञांकडून पाहणी

नव्वद टक्के बटाट्याचे बियाणे बोगस
पुसेगाव : पुसेगाव, ता. खटाव येथील बटाटा बाजारपेठेतून खरेदी केलेले ४२ क्विंटल एटीएल बटाटा बियाणे नव्वद टक्के बोगस असल्याची प्राथमिक माहिती तपासणीसाठी आलेल्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कृषी संशोधन केंद्राच्या तज्ज्ञांनी दिली आहे. या झाडांचे बटाटे अधिक तपासणीसाठी राजगुरूनगर येथील कृषी संशोधन केंद्रात पाठविण्यात येणार आहे.
पुसेगाव येथील जाधव ट्रेडिंग कंपनी यांच्याकडून खरीप हंगामात सुमारे नऊ ट्रक बटाट्याचे बोगस बियाणे विक्री झाल्याची माहिती पुढे येत आहे. खरेदी केलेले ४२ क्विंटल एटीएल बटाटा बियाणे बोगस असल्याची तक्रार निकम यांनी पंचायत समिती (वडूज)कडे केली आहे. त्यानुसार बुधवारी (दि. २६) दुपारी तीन वाजता विभागीय कृषी अधिकारी व तंत्रज्ञ ए. जी. पाटील, बोरगाव कृषी तंत्रविज्ञानचे तंत्रज्ञ बी. एम. यादगीरवाड, खटाव तालुका पंचायत समितीचे कृषी अधिकारी बोडरे, मंडल कृषी अधिकारी देशमुख यांनी काटकरवाडी येथे जाऊन निकम यांच्या बटाटा शेताची पाहणी केली. यावेळी पुसेगाव, फडतरवाडी, दिवडी, काटकरवाडी, कटगुण, विसापूर, गारवडी या भागातील सुमारे ३५ शेतकरी हजर होते. त्यांनीही या बोगस बटाटा बियाण्यासंदर्भात अधिकाऱ्यांपुढे आपले गाऱ्हाणे मांडले.
या पाहणीनंतर नव्वद टक्के बटाटा बियाणे बोेगस असल्याचा प्राथमिक अंदाज या पथकाने व्यक्त केला. हा अहवाल व बटाटा तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. (वार्ताहर)
उगवण क्षमतेवर परिणाम
पुसेगाव, फडतरवाडी, दिवडी, काटकरवाडी, कटगुण, विसापूर, गारवडी या भागांतील अनेक शेतकऱ्यांनी एटीएल जातीचे बटाटा बियाणे खरीप हंगामात खरेदी केले. बटाटा लावल्यानंतर त्याची उगवण क्षमता केवळ सत्तर टक्के इतकीच राहिली. नेहमीप्रमाणे औषधांचा व खतांचा योग्य वापर व पाण्याचे योग्य व्यवस्थापन करूनदेखील बटाटा पिकाची वाढ झाली नाही. तसेच काढणीच्या वेळीही झाडाला नाममात्र बटाटे लागलेले पाहावयास मिळाले.
मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. मला शेतकऱ्यांच्या दु:खाची जाणीव आहे. बोगस बटाटा बियण्यांची विक्री कधीही केली नाही. जर असे असेल तर संबंधित शेतकऱ्यांनी हे सिद्ध करुन दाखवावे
- वैभव जाधव
(मालक, जाधव ड्रेडिंग कंपनी)
निकम यांच्या शेतात बटाटा पिकाचा पंचनामा करून अहवाल तयार केला आहे. ९० % बटाटा बियाणे बोगस असून, मार्केटमध्ये न चालणारे आहे. अहवाल व बटाटा अधिक तपासणीसाठी कृषी संशोधन केंद्रात पाठविण्यात येणार आहे.
- ए. जी. पाटील
विभागीय कृषी अधिकारी व तंत्रज्ञन