भाविकांवर काळाचा घाला : नऊ जखमी, मृतांत तीन महिलांसह दोन बालके
By Admin | Updated: June 10, 2015 22:52 IST2015-06-10T22:51:41+5:302015-06-10T22:52:05+5:30
मनमाडनजीक तिहेरी अपघातात नऊ ठार

भाविकांवर काळाचा घाला : नऊ जखमी, मृतांत तीन महिलांसह दोन बालके
मनमाड/मालेगाव : अजमेर येथील दर्ग्याचे दर्शन घेऊन परतणाऱ्या प्रवाशांचा टेम्पो, मारुती व्हॅन आणि मालट्रक यांच्यामध्ये झालेल्या तिहेरी भीषण अपघातात नऊ जण जागीच ठार तर नऊ जण जखमी झाले. मनमाडनजीक कानडगाव शिवारात मंगळवारी मध्यरात्री झालेल्या या अपघातातील मृतांमध्ये तीन महिलांसह दोन बालकांचा समावेश आहे.
मनमाड-मालेगाव मार्गावरील चोंढी घाटानजीक कानडगाव शिवारात मनमाडकडून मालेगावकडे जात असलेल्या मालट्रकला समोरून भरधाव येणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरने जोरदार धडक दिली. ट्रकच्या मागे मनमाड रेल्वेस्थानकावरून पंचवटी एक्स्प्रेसमधून उतरलेले प्रवासी घेऊन जात असलेली मारुती व्हॅन ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना या अपघातग्रस्त वाहनांवर जाऊन आदळली. टेम्पोमध्ये अजमेर दर्ग्याच्या यात्रेवरून येणारे प्रवासी बसलेले होते. अपघात इतका भीषण होता की, यामध्ये टेम्पो व मारुती व्हॅनचा चक्काचूर झाला.
अपघातात टेम्पोतील प्रवासी आतिक रमजान तांबोळी (३५), नाजमीन आतिक तांबोळी (१६), दोघेही रा. मनमाड, सायमा निसार तांबोळी (८), हसीना रशीद तांबोळी (५५), तन्वीर निसार तांबोळी (६), रा. कोळगाव थडी कोळपेवाडी तसेच मारुती व्हॅनमधील अब्दुल कुद्दुस हाजी मोहंमद शफी (५८) रा. गल्ली नं. १४, नयापुरा मालेगाव, मोहंमद आरीफ मोहंमद फारुक इरशत (४२) रा. किल्ला मालेगाव, चालक प्रशांत सुरेश महाजन (खैरनार), तिघे रा. मालेगाव, विशाल गणेश शेटे (३६), रा. विद्युतनगर, धुळे हे नऊ जण जागीच ठार झाले, तर नऊ जण जखमी झाले. जखमींमध्ये मुमताज रमजान तांबोळी (६५), शबाना आतिक तांबोळी (३२), सानिया आतिक तांबोळी (१३) तिघे रा. मनमाड, निसार रशीद तांबोळी (२०) , निलोफर तांबोळी (२५), अन्सार रशीद तांबोळी (३०) तिघेही रा. कोळपेवाडी, मोहमद अरीफ मो. बशीर (३०), इरफान अब्दुल मजीद (३२), रा. मालेगाव, मोहंमद आतिक मोहंमद बशीर (४२), रा. धुळे यांचा समावेश आहे.
याप्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात मारुती व्हॅनचालक प्रशांत सुरेश खैरनार याच्यावर अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चांदवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट करीत आहेत. (वार्ताहर)