साताऱ्यात नऊ वर्षे दिसणार नऊ रूपं!

By Admin | Updated: September 30, 2014 00:06 IST2014-09-30T00:05:36+5:302014-09-30T00:06:04+5:30

नवदुर्गा : कामाठीपुरा येथील संघर्ष मित्र समूहानं साकारला ‘शैलपुत्री’ दुर्गावतार

Nine forms to be seen in Satara in nine years! | साताऱ्यात नऊ वर्षे दिसणार नऊ रूपं!

साताऱ्यात नऊ वर्षे दिसणार नऊ रूपं!

सातारा : आपल्याला दुर्गादेवीची नऊ नावे माहीत असली तरी तिची नऊ रूपे पाहायला मिळत नाहीत. म्हणूनच कामाठीपुरा येथील संघर्ष मित्र समूहाने यंदापासून दुर्गादेवीची नऊ रूपे लोकांसमोर घेऊन येण्याचा प्रयत्न केला आहे. तिच्या नऊ रूपांपैकी पहिल्या ‘शैलपुत्री’ रूपातील मूर्तीची मंडळाने प्रतिष्ठापना केली आहे.
या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे बंगाल, गुजरात, महाराष्ट्र या राज्यातील मूर्तीचा अभ्यास करून ही मूर्ती बनविण्यात आली आहे. नऊ फूट उंचीच्या या मूर्तीच्या भाळी मळवट दिसतो, हे वेगळेपण आहे. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राहुल महिपाल यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही शैलपुत्री देवीची मूर्ती जिवंतपणाचा आभास निर्माण करते. मूर्तीत बारकावे यावेत, यासाठी दोन महिने काम चालले होते. डोळ्यातला सात्विक भाव दिसावा, यासाठी खास डोळ्यांसाठी कोल्हापूरहून कलाकार बोलावला होता. ही मूर्ती साताऱ्यातील संतोष कुंभार या कारागीराने बनविली आहे. गुजराती आणि बंगाली पद्धतीने देवीला साडी नेसविण्याचे अवघड धनुष्य अमृता वरगंडे यांनी लीलया पेलले आहे.
दुर्गादेवीच्या नऊ पूजा बांधल्या जातात; पण नऊ रूपांतील मूर्ती पाहणे हा दुर्मिळ योग मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी येणार आहे. संघर्ष मित्र समूहाने तपपूर्ती साजरी करत असताना नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच हा एक भाग आहे. यासाठी अध्यक्ष माधव शेलार, उपाध्यक्ष मिलिंद साळुंखे, सहखजिनदार जितू साळुंखे, दिनेश साळुंखे व सभासद परिश्रम घेत आहेत. तसेच संघर्ष महिला मंचच्या वतीने महिलांसाठी विविध कार्यक्रम घेतले जातात. मंडळाने हिंदू-मुस्लिम ऐक्यही जपले आहे. मंडळाच्या स्थापनेपासून फरिद खान हे खजिनदार आहेत. मूर्तीची पहिली पूजा त्यांच्याच हस्ते बांधली जाते. पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून जन्म घेतल्यामुळे तिला शैलपुत्री’ असे नाव पडले. पार्वती, हेमवती ही तिचीच नावे आहेत, अशी आख्यायिका आहे. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी तिची पूजा आणि आराधना केली जाते. (प्रतिनिधी)
दुर्गादेवीची नऊ रूपे
शैलपुत्री, ब्रम्हचारिणी, चंद्रघंटा, कुश्मांदा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, चामुंडा, सिद्धीदात्री ही दुर्गादेवीची नऊ रूपे आहेत. या आदिशक्तीच्या एक एक रूपाची ओळख दरवर्षी करून देण्याचा प्रयत्न मंडळाच्या माध्यमातून केला जाणार आहे.
आजकाल दुर्गोत्सव दांडिया आणि गरबा एवढ्यापुरताच मर्यादित होत चालला आहे. केवळ मनोरंजन म्हणून या उत्सवाकडे न पाहता या माध्यमातून विविध दुर्गावतारांची माहिती देऊन लोकांमध्ये प्रबोधन करण्याचे व्रत आम्ही हाती घेतले आहे.
- राहुल महिपाल, संस्थापक अध्यक्ष, संघर्ष मित्र समूह

Web Title: Nine forms to be seen in Satara in nine years!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.