रात्रीच्या फोनने काळजात होतंय धस्स..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:41 IST2021-05-11T04:41:48+5:302021-05-11T04:41:48+5:30
प्रगती जाधव-पाटील लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोविड सेंटरमध्ये दाखल असलेल्या रुग्णाची सर्वस्वी जबाबदारी सेंटरमधील कर्मचाऱ्यांची असते; पण रात्री ...

रात्रीच्या फोनने काळजात होतंय धस्स..!
प्रगती जाधव-पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोविड सेंटरमध्ये दाखल असलेल्या रुग्णाची सर्वस्वी जबाबदारी सेंटरमधील कर्मचाऱ्यांची असते; पण रात्री अपरात्री त्यांच्या प्रकृतीत काही बिघाड जाणवला तर त्याबाबत तातडीने नातेवाइकांना कळविण्यात येते. कोविड सेंटरमधून रात्री अपरात्री आलेला फोन नातेवाइकांच्या काळजाचा ठोका चुकवत आहे. कुटुंबातील महत्त्वाच्या लोकांना घेऊन कोविड सेंटरमध्ये जाऊन वैद्यकीय तज्ज्ञांची भेट घेईपर्यंत ही अस्वस्थता संपत नाही.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची कारणे वेगवेगळी असली तरी असे अनेक कुटुंबीय आहेत, जे कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूसाठी स्वत:ला दोषी मानत आहेत. कुटुंबातील सदस्य, मित्राचा मृत्यू झाल्यास त्याला वाचविण्यासाठी आपण काहीच करू शकलो नाही याचं शल्य त्यांच्या बोलण्यातून जाणवतं. सेंटरमध्ये दाखल असलेल्या रुग्णांच्या अन्य नातेवाइकांसोबत ओळख झाल्यानंतर परस्परांशी दु:ख व्यक्त करून एकमेकांना आधार देण्याचं काम कोविड सेंटरच्या बाहेर सुरू असतं. सेंटरमध्ये दाखल असलेल्या रुग्णाबरोबर नातेवाईक मोबाईलद्वारे संपर्क साधतात. काहीवेळा ठणठणीत बरा असलेल्या रुग्णाची प्रकृती अचानकच खालावते. त्यामुळे नातेवाइकांना तातडीने कळविल्यानंतर कुटुंबात भयंकर अस्वस्थता वाढते. एकमेकांना आधार देतच सर्व नातेवाईक सेंटरला दाखल होतात. रात्री एक, दीडनंतर येणाऱ्या गाड्या या केवळ याच कारणांनी सेंटरमध्ये दाखल होत असल्याचे पाहायला मिळते.
आईला काही झालं तर मी आत्महत्या करेन!
जंबो कोविड रुग्णालयात तिशीतला एक रुग्ण दाखल झाला. त्याचे वडील कोविडने गेल्यानंतर तो आणि त्याची आई दोघेही पॉझिटिव्ह आले. मित्रांच्या ओळखीने त्याला जंबोमध्ये दाखल करण्यात आले; पण त्याच्या आईसाठी कुठंही बेड उपलब्ध होईना. जन्मादात्यांसाठी आपण काहीच करू शकत नाही आणि स्वत: मात्र उपचार घेतोय, ही बाब त्याला इतकी बोचली की त्याने ‘आईला बेड मिळाला नाही तर मी आत्महत्येचा मार्ग अवलंबेन’ अशा भावना फेसबुकवर व्यक्त केल्या. त्यानंतर त्याच्या मित्रांनी धावपळ करून तिलाही बेड मिळवून दिला.
अवघं कुटुंब पॉझिटिव्ह... एकटा कुठं कुठं पळू
खटाव तालुक्यातील एक युवक गेल्या चार दिवसांपासून कोविड सेंटरच्या चकरा मारतोय. आजोबा, काका, वडील, भाऊ, आई, आजी, बायको कुटुंबातील ही सर्व मंडळी पॉझिटिव्ह आहेत. गंभीर आजारी असणारे चौघे रुग्णालयात, तर तिघे घरीच उपचार घेत आहेत. वहिनी, मुलं आणि तो स्वत: निगेटिव्ह आहे. वहिनी मुलांची आणि घरी असलेल्यांची देखरेख करतेय, तर हा स्वत: चार दवाखान्यांत दाखल असलेल्या चौघांकडे आळीपाळीने जातो. गाडी नाही आणि रिक्षा परवडत नाही म्हणून रोज चालत हे दौरे त्याला करावे लागतात. तिघांना सरकारी दवाखान्यात दाखल केल्यानंतर आता चौथ्या रुग्णाचे बिल भरण्याचा ताणही त्याच्यावर आहे.