खबर मृतदेहाची; पण मिळालं कुत्रं!
By Admin | Updated: April 13, 2015 00:01 IST2015-04-12T22:07:17+5:302015-04-13T00:01:04+5:30
मलकापुरात दीड तासाचा ‘सस्पेन्स’ : पोलिसांसह यंत्रणा लागली कामाला, महामार्गावर वाहतूक खोळंबली, गाठोडं सोडताच पिकला हशा--आॅन दि स्पॉट रिपोर्ट...

खबर मृतदेहाची; पण मिळालं कुत्रं!
माणिक डोंगरे -मलकापूर - महामार्गानजीकच्या नाल्यामध्ये चादरीत गुंडाळलेल्या स्थितीत मृतदेह पडला असल्याची माहिती रविवारी सकाळी कऱ्हाड शहर पोलिसांना समजली. या बातमीने पोलीस दलासह सर्व यंत्रणा हादरली. तत्काळ सर्व अधिकारी आवश्यक त्या साधनांसह घटनास्थळी पोहोचले. अगदी पंचनाम्याची तयारीही करण्यात आली; पण ज्यावेळी नाल्यात पडलेली चादर हटवली त्यावेळी पोलिसांना कपाळावर हात मारून घेण्याची आणि उपस्थितांना पोट धरून हसण्याची वेळ आली.
मलकापूर येथे मळाईदेवी पतसंस्थेपासून काही अंतरावर महामार्गाकडेच्या नाल्यात चादरीमध्ये गुंडाळलेल्या स्थितीत मृतदेह पडला असल्याची माहिती रविवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात नागरिकाने महामार्ग देखभाल विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली. माहितीची खातरजमा करण्यासाठी देखभालचे कर्मचारीही त्याठिकाणी पोहोचले. त्यावेळी नाल्यात त्यांना चादरीचे गाठोडे दिसून आले.
गाठोड्याच्या बांधणीवरून त्यामध्ये मृतदेह असावा, असा संशय निर्माण झाला. त्यामुळे देखभालच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने ही माहिती कऱ्हाड शहर पोलिसांना दिली. त्यानंतर शहर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांसह कर्मचारीही तातडीने त्याठिकाणी पोहोचले. पोलीस अधिकाऱ्यांनीही गाठोड्याची पाहणी केली. मात्र, गाठोडे ज्या पद्धतीने बांधले होते आणि ज्या स्थितीत ते पडले होते. त्यावरून पोलिसांचाही संशय बळावला.
पोलिसांनी पंचनाम्यासह इतर सोपस्कारासाठी आवश्यक असणारी सामुग्री गोळा करण्यास सुरूवात केली. वैद्यकीय पथकासह छायाचित्रकारालाही त्याठिकाणी पाचारण करण्यात आले. सर्व लवाजमा पोहोचल्यानंतर पोलिसांसमक्ष नाल्यात पडलेले ते गाठोडे सोडण्यात आले. खबरदारी म्हणून गाठोडे सोडणाऱ्यांनीही त्यावेळी ‘हॅन्डग्लोज’ घातले होते.
नाल्यातून बाहेर काढताना गाठोडे जड वाटले. त्यामुळे संशय अधिकच बळावला; पण ज्यावेळी गाठोड्याची गाठ सोडली, त्यावेळी पोलिसांनी कपाळावर हात मारला.
चादरीच्या गाठोड्यात चक्क मृत कुत्रा आढळून आला. त्यामुळे उत्सकुतेपोटी त्याठिकाणी धावलेले नागरिक पोट धरून हसायला लागले. त्यानंतर चादरीचे गाठोडे पुन्हा नाल्यात टाकून पोलिसांनी फौजफाट्यासह तेथून काढता पाय घेतला.
पाळीव कुत्रा नाल्यात
वेगवेगळ्या जातीची कुत्री पाळणे प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. किमान दहा हजारांपासून ते पन्नास हजारांपर्यंतची कुत्री पाळण्याचा शौक आपल्याकडे आहे. त्या पाळीव कुत्र्यांना जोपासताना हजारो रूपये खर्च केले जातात. वेळप्रसंगी काहीजण महागड्या गाडीतून कुत्र्याला फिरवतात. घरातील स्वयंपाकगृहापर्यंतही कुत्र्याचा वावर असतो. एवढं प्रेम करणारी माणसंसुध्दा पाळीव कुत्रा मेल्यानंतर त्याची विल्हेवाट लावण्याऐवजी नाल्यात फेकतात हा चर्चेचा विषय आहे.
अफवांना ऊत
मलकापूरच्या हद्दीत महामार्गाकडेला नाल्यात कोणालातरी एकाला मारून टाकले आहे, हातपाय बांधून गाठोडे रस्त्याकडेला टाकले आहे, खून करून फेकून दिले आहे, अशा अनेक अफवा दुपारपर्यंत शहरात पसरल्या होत्या. तसेच हीच घटना शामगाव घाटात घडल्याची आणखी एक अफवा शामगाव भागात पसरली होती. त्यामुळे शामगावचे ग्रामस्थ घाटाकडे तर कऱ्हाड, मलकापूरचे नागरिक महामार्गाकडेला मृतदेह पाहण्यासाठी धाव घेत होते.
...असं होतं गाठोडं
चादरीसारख्या मोठ्या कपड्यात मृत कुत्रे बांधून ते गाठोडे अज्ञाताने नाल्यात टाकले होते. ते गाठोडे बांधताना कुत्र्याचे मुंडके व पाय गुंडाळून एकाच ठिकाणी गुंडाळून बांधण्यात आले होते. ज्यामुळे गाठोड्याला मानवी शरीराचा आकार आला होता.
पंचनाम्याची तयारी
महामार्गालगतच्या नाल्यात मृतदेह बांधलेले गाठोडे पडले असल्याचे समजताच महामार्ग देखभाल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी जाऊन अधिकाऱ्यांनी पाहिले असता गाठोड्यात मृतदेहच असावा, असा कयास केला. पंचनाम्यासाठी हातात कागद आणि पेन घेऊन पोलीस सरसावले होते तर मृतदेह उचलून रूग्णवाहिकेत ठेवण्यासाठी वैद्यकीय कर्मचारी हातात ग्लोज घालून उभे होते.
घटनास्थळी बघ्यांची गर्दी
दररोजच्या घडामोडीत एखाद्या चांगल्या घटनेचा प्रसार उशिरा होतो; पण वाईट घटना कर्णोपकर्णी लगेच पसरतात. याचीच प्रचिती आजच्या घटनेत आली. महामार्गाकडेच्या नाल्यात गाठोड्यात मृतदेह असल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली. बघता-बघता घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी उत्सुकतेपोटी गर्दी केली होती. गर्दीला आवर घालताना पोलीसही धायकुतीला आले.
खबरदारीची उपययोजना
घटनास्थळी बघ्यांची व वाहनांची गर्दी झाली होती. महामार्गाकडेलाच हे ठिकाण असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी खबरदारी घेतली होती. जादा पोलिस बंदोबस्त महामार्गावर ठेवण्यात आला होता. तसेच महामार्ग देखभाल विभागाच्या गाड्या बोलवण्यात आल्या होत्या. काही काळ वाहतूक उपमार्गावरून वळविण्यात आली होती.
शवविच्छेदनाची
सामुग्री सोबत
मृतदेह म्हटलं की तो कोणत्याही घटनेतील असो शवविच्छेदन ही प्रक्रिया ठरलेलीच असते. त्यानुसार आजच्या घटनेवेळीही पोलिसांनी शववाहिनी, मृतदेह हाताळण्यासाठीचे सर्व साहित्य, छायाचित्रकार अशी सर्व सामुग्री घटनास्थळी आणली होती.