महाबळेश्वरमध्ये नवविवाहित दाम्पत्याची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 16:51 IST2018-04-15T16:51:21+5:302018-04-15T16:51:21+5:30
कुटुंबीयांना लग्न मान्य नसल्यानं आत्महत्या करत असल्याचा चिठ्ठीत उल्लेख

महाबळेश्वरमध्ये नवविवाहित दाम्पत्याची गळफास घेऊन आत्महत्या
महाबळेश्वर : एका नवविवाहित दाम्पत्यानं झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना केट्स पॉइंट परिसरात रविवारी उघडकीस आली. 'आमचं लग्न कुटुंबीयांना मान्य होणार नाही आणि आम्ही एकमेकांशिवाय जगू शकत नाही', अशी चिठ्ठी लिहून या दाम्पत्यानं आत्महत्या केली. अविनाश आनंदा जाधव (वय २८) व तेजश्री रमेश नलावडे (वय २४) अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावं आहेत. पाचगणी परिसरातील केट्स पॉईंट येथील जंगलातील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दोघांचे मृतदेह आढळून आले.
घटनास्थळी पोलिसांना एक चिठ्ठी सापडली आहे. त्या चिठ्ठीवरुन दोघांची ओळख पटली. ही चिठ्ठी या दोघांनी त्यांच्या कुटुंबीयांसाठी लिहिली आहे. 'तुम्हाला आमचं लग्न मान्य नाही आणि आम्ही दोघं एकमेकांशिवाय जगू शकत नाही. त्यामुळे आम्ही दोघांनी आत्महत्येचा निर्णय घेतला आहे,' असं या दोघांनी चिठ्ठीत लिहिलं आहे. 'दोन्ही कुटुंबीयांनी एकमेकांना त्रास देऊ नका. अन्यथा आमच्या आत्म्याला शांती लाभणार नाही,' असंही चिठ्ठीत शेवटी नमूद करण्यात आलं आहे. पोलिसांनी दाम्पत्याच्या आत्महत्येची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना दिली आहे.