नववर्षाची पहाट कोठडीत उजाडू नये!
By Admin | Updated: December 30, 2015 00:46 IST2015-12-29T23:15:52+5:302015-12-30T00:46:10+5:30
पोलिसांची ‘फिल्डिंग’: कास, ठोसेघर रस्त्यांवर नाकाबंदी; दारू सापडल्यास कठोर कारवाई

नववर्षाची पहाट कोठडीत उजाडू नये!
सातारा : नववर्षाची पहाट ‘लॉकअप’मध्ये उजाडू नये असे वाटत असेल तर ‘हौशी’ तरुणांनी विनापरवाना दारू बाळगणे आणि प्राशन करणे टाळावे, असा सल्ला पोलिसांनी दिला आहे. निसर्गाच्या सान्निध्यात धिंगाणा आणि मद्यपान करून वाहन चालविण्याचे घातक प्रकार रोखण्यासाठी पोलिसांकडून बुधवारी कास आणि ठोसेघर रस्त्यावर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे.मद्यपान करून वाहन चालविताना आढळल्यास संबंधिताला अटक करण्याचे अधिकार पोलिसांना असून, मोटार वाहन कायद्याच्या कलम १८५ नुसार गुन्हा दाखल होऊ शकतो. या गुन्ह्यात जामीन देण्याचे अधिकार पोलिसांना नाहीत; त्यामुळे दुसऱ्या दिवशी न्यायालयात हजर केल्यावरच जामिनावर विचार होऊ शकतो. परिणामी, रात्र कोठडीत व्यतीत करावी लागू शकते आणि नववर्षाची पहाट तेथेच पाहावी लागू शकते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
हौशी मंडळी निसर्गाच्या सान्निध्यात नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने जातात. साताऱ्याजवळील यवतेश्वर, कास परिसर तसेच ठोसेघर रस्त्यावरील अनेक ठिकाणे युवकांना भुरळ घालतात. तथापि, परवान्याशिवाय मद्यसाठा वाहनात आढळल्यास पोलीस तातडीने संबंधिताला ताब्यात घेणार आहेत. विक्रीसाठी मद्य बाळगणाऱ्यावर कारवाई करण्यात येणार आहे. अवघड, अरुंद रस्ते असलेल्या भागात मद्य सोबत घेऊन जाऊ नये आणि त्यातून धोका निर्माण होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
कास वनसमितीही सज्ज
वनविभागाच्या हद्दीत धिंगाणा करणे, वन्यजीवांना अडथळा येईल असे वर्तन करणे अशा बाबींवर वनविभागाचे अधिकारी लक्ष ठेवून असतील. अशा व्यक्तींविरुद्ध वन अधिनियमाच्या उल्लंघनाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. विशेषत: कास परिसरात हे पथ्य पाळावे, अशी अपेक्षा संयुक्त वनव्यवस्थापन समितीने व्यक्त केली आहे. वणवे लावण्यासारखे प्रकार आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा समितीतर्फे विष्णू किर्दत यांनी दिला आहे.
नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष जरूर असावा; परंतु कोणालाही त्रास होईल असे वर्तन करू नये. मद्यपानाचा परवाना असला तरी ते बाळगण्याचा परवाना नसल्यास बाळगणाऱ्याला रात्र कोठडीत काढावी लागेल. कास, ठोसेघर रस्त्यांबरोबरच कण्हेर आणि उरमोडी धरण परिसरातही तपासणी करण्यात येणार आहे.
- दत्तात्रय नाळे,
पोलीस निरीक्षक, सातारा तालुका