कोयना विभागात पावसाचा नवा विक्रम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:40 IST2021-07-27T04:40:00+5:302021-07-27T04:40:00+5:30

कोयनानगर : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सलग चार दिवस पडलेल्या मुसळधार पावसाने अनेक नवे विक्रम स्थापित केले आहेत. कोयना ...

New rain record in Koyna division! | कोयना विभागात पावसाचा नवा विक्रम!

कोयना विभागात पावसाचा नवा विक्रम!

कोयनानगर : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सलग चार दिवस पडलेल्या मुसळधार पावसाने अनेक नवे विक्रम स्थापित केले आहेत. कोयना धरणाच्या उभारणीपासून आजअखेरपर्यंतचा सर्वात जास्त पाऊस या चार दिवसात कोसळला असून, चार दिवसांतील या पावसाने हाहाकार माजविल्याचे पाहायला मिळाले.

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २१ ते २४ जुलै या चार दिवसांत उच्चांकी पाऊस पडला असून, या पावसाने धरणाच्या निर्मितीपासूनचे अनेक विक्रम मोडले आहेत. नव्याने काही विक्रम या पावसाने स्थापित केले असून, हा पाऊस विनाशकारी ठरल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी २०१९ आणि २००५ मध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला होता. मात्र, कमी दिवसात मोठ्या प्रमाणावर झालेला पाऊस अशी या चार दिवसांतील पावसाची नोंद झाली आहे. चार दिवसांत कोयना धरणामध्येही उच्चांकी पाणीसाठा झाला. त्याबरोबरच धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यापेक्षा ओढे, नाले आणि उपनद्यांतून आलेल्या पाण्यामुळे महापूर निर्माण झाल्याचे स्थितीही या चार दिवसांत अनुभवायला मिळाली.

पाटणसह महाबळेश्वर आणि वाई तालुक्यात यापूर्वी दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, हे प्रमाण कमी होते. तसेच दरड कोसळून झालेला विध्वंसही कमी प्रमाणात होता. अपवाद वगळता जिल्ह्यात दरड कोसळून जीवितहानी झाली नव्हती. मात्र, चार दिवसांत झालेल्या पावसाने दरडी कोसळून अनेकांचा बळी गेला. तसेच महापुरातही अनेकांना जीव गमवावा लागला. शेकडो कुटुंबे बेघर झाली. शेती वाहून गेली. रस्ते उखडले. त्याबरोबरच पूलही उद्ध्वस्त झाल्याचे पाहायला मिळाले. २१ ते २४ जुलै या दरम्यान पडलेला पाऊस खरोखरच उच्चांकी असल्याचे शासकीय आकडेवारीवरून स्पष्ट होत असून, कोयना पाणलोट क्षेत्रात या पावसाने विक्रम प्रस्थापित केला आहे.

- चौकट

एका दिवसात १६.४१ टीएमसी पाणीसाठा

कोयना धरणाच्या निर्मितीनंतर १९६१ सालापासून एका दिवसात १२.६५ टीएमसी पाणी आवकची उच्चांकी नोंद ३ ऑगस्ट २०१९ रोजी झाली होती. ती यंदा २३ जुलैच्या पावसाने मोडीत काढली असून, एका दिवसात धरणात १६.४१ टीएमसी एवढा पाणीसाठा झाला. हा नवा विक्रम यंदाच्या पावसाने नोंदवला.

- चौकट

पावसाचा विक्रम

ठिकाण : २३ जुलै २०१९ : २६ जुलै २००५

कोयना : ५५८ मिमी : ६१० मिमी

नवजा : ७४६ मिमी : ५५२ मिमी

महाबळेश्वर : ५५६ मिमी : ४२४ मिमी

- चौकट

ढगफुटीपेक्षाही जास्त पाऊस

भारतीय हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार एका दिवसात २०४ मिलिमीटर पाऊस म्हणजे अतिपाऊस. तर ४०० मिलिमीटर म्हणजे ढगफुटी. मात्र, कोयना पाणलोट क्षेत्रात २३ जुलै रोजी एकूण सरासरीनुसार ६३७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, ढगफुटीपेक्षाही हा पाऊस जास्त आहे.

- चौकट

... कसा कोसळला पाऊस

२१ जुलै : मुसळधार पावसाला सुरुवात

२१ जुलै : सकाळी ८ वाजता धरणात ५७.३५ टीएमसी पाणीसाठा होता.

२२ जुलै : पाणीसाठा ६५.६५ टीएमसीवर पोहोचला.

२२ जुलै : पायथा वीजगृह सुरू करून पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

२२ जुलै : ३ लाख ९० हजार ९९४ क्यूसेक एवढी प्रचंड आवक होती.

२३ जुलै : सहा वक्र दरवाजे टप्प्याटप्प्याने १२ फुटांपर्यंत नेले.

२४ जुलै : सर्वाधिक ५५,१३२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

- चौकट

पाणीसाठा ९०.१४ टीएमसीवर

सध्या विसर्ग कमी करत दरवाजे साडेपाच फुटांवर स्थिर ठेवण्यात आले आहेत. कोयना नदीपात्रात ३२ हजार ७४९ क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. तर धरणातील पाणीसाठा ९०.१४ टीएमसी असून, आवक ६९ हजार ६१४ क्यूसेक प्रतिसेकंदने सुरू आहे.

- चौकट

सरासरी ५ हजार मिमी पाऊस...

कोयना पाणलोट क्षेत्रात सरसरी पाच हजार मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा आजअखेर २६ जुलैपर्यंत कोयना २,८५६ मिमी, नवजा ३,६९८ मिमी तर महाबळेश्वर ३,६७७ मिमी एवढ्या पावसाची नोद झाली आहे.

Web Title: New rain record in Koyna division!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.