पोलिसांपूर्वी संशयित आरोपींनीच केले नवीन पोलीस ठाण्याचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:38 IST2021-03-19T04:38:07+5:302021-03-19T04:38:07+5:30
वडूज : येथील पोलीस ठाणे नवीन अद्ययावत अशा ग्रीन इमारतीत काही दिवसांतच गृहप्रवेश करून सुरू होईल, असे वाटत ...

पोलिसांपूर्वी संशयित आरोपींनीच केले नवीन पोलीस ठाण्याचे उद्घाटन
वडूज : येथील पोलीस ठाणे नवीन अद्ययावत अशा ग्रीन इमारतीत काही दिवसांतच गृहप्रवेश करून सुरू होईल, असे वाटत होते. मात्र, गत एक वर्षापासून ही इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. अखेर या इमारतीत पोलीस ठाणे शिफ्ट झालेच नाही. पण, पडळ कारखाना मृत्यूप्रकरणी संशयित आरोपींना नव्या इमारतीच्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आले. पोलीस उद्घाटनासाठी थांबले पण आरोपींनी मात्र नव्या पोलीस ठाण्याचे उद्घाटन केले अशी चर्चा वडूज परिसरात आहे.
खटाव तालुक्यातील वडूज येथे दहिवडी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय हे गत १७ वर्षांपासून भाडेतत्त्वावर आहे. खटाव तालुक्यातील वडूज, औंध, मायणी, पुसेसावळी पोलीस ठाणे तर माण तालुक्यातील म्हसवड, दहिवडी ही दोनच पोलीस ठाणी या विभागांतर्गत कार्यरत आहेत. वडूजमध्ये जिल्हास्तरीय न्यायालय, कनिष्ठ न्यायालय असून खटाव तालुक्याचा क्राईम रेट पाहता हे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय वडूज येथेच असणे फार महत्त्वाचे आहे. प्रारंभी नगरपंचायत या ठिकाणी वास्तव्यास येणार होती. जिल्हाधिकारी यांची नाममात्र भाडेतत्त्वावर मान्यता असतानाही या इमारतीचे नेमके नगरपंचायतीला वावडे का ? हा सध्या संशोधनाचा विषय ठरत आहे.
वडूज शहरात मध्यवर्ती ठिकाणी जुने तहसील कार्यालय व पोलीस ठाण्याच्या इमारतीचे बांधकाम हे पूर्ण दगडी असून १९६५ साली ते पूर्ण केले होते. या इमारतीत वडूज पोलीस ठाण्यासह जुने तहसील कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, सेतू कार्यालय असे मिळून सर्वसाधारणपणे ८ हजार स्क्वे. फूट बांधकामात ही इमारत उभी असून त्यापैकी २ हजार स्क्वे. फूट इमारतीत वडूज पोलीस ठाण्याचा कारभार चालतो. गत दोन वर्षांपूर्वी तालुक्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीत तहसीलदार कार्यालय तसेच दुय्यम निबंधक कार्यालयाचे स्थलांतर झाले. त्यामुळे याठिकाणी सध्या फक्त पोलीस ठाणे, सेतू कार्यालय व आधार केंद्र आहेत.
पोलीस ठाण्याचेसुद्धा लवकरच दहिवडी - कऱ्हाड रस्त्यावरील हुतात्मा परशुराम विद्यालयाशेजारी नवीन अत्याधुनिक अशा जिल्ह्यातील पहिल्या ग्रीन इमारतीत स्थलांतर होणार होते. मात्र, प्रशासकीय उदासीनता म्हणा अथवा स्थानिक राजकीय नेतेमंडळींची टाळाटाळ यामुळे गृहप्रवेश लांबतोय. परंतु, नियतीपुढे तुम्ही-आम्ही नेहमीच हतबल होत असतो. हा इतिहास आहे. निमित्त कोणतेही असो, पडळ कारखाना अधिकारी मृत्यूप्रकरणी संशयित आरोपींची संख्या पाहता एकाच ठिकाणी सर्वांना एकत्रित ठेवता येत नव्हते. त्यामुळे नवीन पोलीस ठाणे इमारतीत काही ठरावीक संशयित आरोपींना पोलीस कोठडीत ठेवावे लागले. त्यामुळे नूतन पोलीस ठाण्याच्या गृहप्रवेश अगोदरच संशयित आरोपींना जेलबंद व्हावे लागले, हा फार मोठा इतिहास वडूजच्या आत्मचरित्रात नोंद झाला असेच म्हणावे लागेल.