पाण्याच्या निचऱ्यासाठी नवीन पाइपलाइन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:29 IST2021-06-04T04:29:17+5:302021-06-04T04:29:17+5:30
शहरासह तालुक्याला मंगळवारी पावसाने झोडपून काढले. त्या वेळी ठिकठिकाणी पाण्याचा निचरा न झाल्यामुळे गंभीर समस्या निर्माण झाली. पुन्हा ही ...

पाण्याच्या निचऱ्यासाठी नवीन पाइपलाइन
शहरासह तालुक्याला मंगळवारी पावसाने झोडपून काढले. त्या वेळी ठिकठिकाणी पाण्याचा निचरा न झाल्यामुळे गंभीर समस्या निर्माण झाली. पुन्हा ही समस्या उद्भवू नये, यासाठी पाच ठिकाणी नवीन गटर लाइन टाकण्याचा निर्णय घेण्यात आला असून, लवकरच त्याला प्रारंभ होणार आहे. शहरातील मार्केट यार्ड ते कोल्हापूर नाका परिसरातील महालक्ष्मी दुकानापर्यंत चार फुटांची पाइपलाइन टाकण्यात येणार आहे. त्याचबरोबर पोपटभाई पेट्रोल पंपापासून पंकज हॉटेलपर्यंत नवीन स्वतंत्र पाइपलाइन टाकण्यात येणार आहे. त्यामुळे पोपटभाई पेट्रोल पंप परिसरातील पाण्याचा निचरा होण्यास मदत होणार आहे. याच परिसरात कोल्हापूर नाका ते पेट्रोल पंपापर्यंत नाल्याची रुंदी वाढविली जाणार असून, पाइपलाइन टाकली जाणार आहे. याशिवाय तालुका पोलीस ठाण्यापासून भेदा चौकापर्यंत स्वतंत्र पाइपलाइनद्वारे पाणी शाहू चौकमार्गे पुढे नदीकडे सोडले जाणार आहे.
भेदा चौक ते विजय दिवस चौक या मार्गावरील नाल्यांना मार्केट यार्ड भागातून येणारे पाणी जोडणे शक्य आहे का, याचाही विचार सुरू आहे. कार्वे नाका परिसरातील रेठरेकर कॉलनी, विजय दिवस चौकातील साई मंदिर परिसरातही नवीन पाइपलाइन टाकण्यात येऊन या परिसरात पाणी साचू नये, यासाठी उपाययोजना केली जाणार असल्याचे आरोग्य सभापती विजय वाटेगावकर यांनी सांगितले.
फोटो : ०३केआरडी०२
कॅप्शन : कऱ्हाड शहरात पाणी साचलेल्या ठिकाणी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, आरोग्य सभापती विजय वाटेगावकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली.