लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा शहराची झालेली हद्दवाढ लक्षात घेता पर्यावरण नियोजन व तंत्रज्ञान केंद्र यांच्या वतीने सातारा पालिकेला तीन हजार लीटर क्षमतेची मैला गाडी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या नव्या गाडीमुळे शहर स्वच्छतेला बळकटी देण्याचा प्रयत्न प्रशासानाने केला आहे.
सातारा पालिका हद्दीतील सार्वजनिक व वैयक्तिक शौचालयांच्या स्वच्छतेकरिता सेफ्टिक टँक, रोटावेटर प्लीट, डोम ब्रश आणि मुबलक पाणीपुरवठ्याच्या क्षमतेसह तीन हजार लीटर क्षमतेची नवीन मैला (सक्शन) गाडी सातारा पालिकेला उपलब्ध झाली आहे. शहराच्या हद्दीवाढीनंतर मूळच्या ३३ हजार मिळकतींमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. म्हणूनच सीएसआर योजनेअंतर्गत सातारा पालिकेने पाठपुरावा केल्यानंतर अद्ययावत मैला गाडी उपलब्ध करून घेण्यात यश मिळविले.
सातारा पालिकेच्या सोनगाव येथील कचरा डेपोवर मैला प्रक्रिया केंद्र नोव्हेंबर २०१९ मध्ये उभारण्यात आले आहे. या केंद्रात प्रतिदिन वीस हजार लिटर मैल्यावर प्रक्रिया करण्यात येते. आता या केंद्राची क्षमता तीस हजार लीटर करण्यात येत असून या केंद्राच्या सक्षमीकरणासाठी सीएसआर अंर्तगत वीस लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे.
कालबद्ध रीतीने मैला टाक्या उपसणे, मैला केंद्राची क्षमता वाढविणे, सेप्टिक टॅंकचे निर्जंतुकीकरण या तीन महत्त्वाच्या उदि्दष्टांसाठी सातारा पालिकेने मैला उपसा शास्त्रीय पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल साठ हजार मिळकतींना या सुविधेचा फायदा होणार असून, आरोग्य विभागाने मैला गाडीच्या वेळापत्रकाचे नियोजन सुरू केले आहे.
फोटो मेल :
सातारा पालिकेच्या नव्या मैला गाडीचे उद्घाटन खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते झाले. या वेळी नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, अनिता घोरपडे, सीता हादगे आदी उपस्थित होते.