उत्तर कोरेगाव तालुक्यात लवकरच उभारणार नवीन औद्योगिक वसाहत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:13 IST2021-02-06T05:13:21+5:302021-02-06T05:13:21+5:30
वाठार स्टेशन : कायमस्वरूपी दुष्काळी भाग अशी ओळख असलेल्या कोरेगाव तालुक्याच्या उत्तर दुष्काळी भागासाठी लवकरच नवीन औद्योगिक वसाहत उभारण्यात ...

उत्तर कोरेगाव तालुक्यात लवकरच उभारणार नवीन औद्योगिक वसाहत
वाठार स्टेशन : कायमस्वरूपी दुष्काळी भाग अशी ओळख असलेल्या कोरेगाव तालुक्याच्या उत्तर दुष्काळी भागासाठी लवकरच नवीन औद्योगिक वसाहत उभारण्यात येणार आहे. याबाबत हालचाली सुरू झाल्या असून विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी याबाबत संबंधितांना सूचना केल्या आहेत.
कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील सोळशी गावापासून कोरेगाव तालुक्याची सुरुवात होते सोळशी, नायगाव, नांदवळ, सोनके, पिंपोडे बुद्रुक या गावांतील शेकडो एकर जमिनी सध्या मोठ्या प्रमाणात पडिक आहेत. या गावांच्या मधोमध अशा पडिक जमिनीवर औद्योगिक वसाहतीची उभारणी करण्याबाबतीत नुकतीच मुंबई येथे एक बैठक विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. बैठकीला राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी तसेच कोरेगावच्या प्रांताधिकारी ज्योती पाटील उपस्थित होत्या. कोरेगाव तालुक्याच्या उत्तर दुष्काळी भागात सध्या वासना उपसा सिंचन योजनेमुळे पाण्याची समस्या सुटली आहे. मात्र या भागातील वाढती बेरोजगारी ही प्रमुख समस्या सोडविण्यासाठी कित्येक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. या भागातील युवकांना रोजगार मिळाला, तर या दुष्काळी भागाचा कलंक पुसण्यात यश येईल. यासाठी रामराजे नाईक-निंबाळकर यांनी विशेष लक्ष घातले आहे.
कोरेगाव तालुक्याचा हा भाग माढा लोकसभा, तर विधानसभेसाठी फलटण तालुक्याला जोडण्यात आल्याने या भागाचा आता दुष्काळी भाग हा कलंक पुसला जाणार आहे. यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू झाले असल्याने लवकरच आता या भागात औद्योगिक वसाहत उभारून या भागातील युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
कोट
कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात एमआयडीसी व्हावी यासाठी अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू होता. त्याला आता यश आले आहे. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी याबाबतीत प्रशासनाला सूचना केल्या आहेत. आम्हीही भूमिपुत्र म्हणून आमच्यावर जी जबाबदारी सभापती रामराजे देतील, ती पार पाडण्यासाठी पुढाकार घेऊ.
- सतीश धुमाळ, माजी जिल्हा सदस्य, सोनके
चौकट
माहिती घेण्याचे काम
कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात एमआयडीसी उभारण्याबाबतीत काही दिवसांपूर्वी मुंबई येथे बैठक झाली होती. या बैठकीला मी स्वतः उपस्थित होते. यावेळी माहिती घेण्याच्या सूचना आम्हाला देण्यात आल्या आहेत. याबाबतीत लवकरच माहिती दिली जाणार आहे, अशी माहिती प्रांताधिकारी ज्योती पाटील यांनी दिली.