मॅरेथॉनमुळे कऱ्हाडची नवी ओळख

By Admin | Updated: December 23, 2015 01:31 IST2015-12-23T00:34:08+5:302015-12-23T01:31:47+5:30

अभिनव देशमुख : स्पर्धकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद; शेतकरी, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी धावले

The new identity of Karhad due to the marathon | मॅरेथॉनमुळे कऱ्हाडची नवी ओळख

मॅरेथॉनमुळे कऱ्हाडची नवी ओळख

कऱ्हाड : ‘सहकार, सामाजिक व शैक्षणिक विकासाचे प्रणेते सहकारमहर्षी दिवंगत जयवंतराव भोसले यांच्या जयंतीनिमित्त कृष्णा रुग्णालय व वैद्यकीय संशोधन केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कृष्णा मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पहिल्याच वर्षी कृष्णा मॅरेथॉनला स्पर्धकांकडून मिळालेला प्रतिसाद पाहता भविष्यात कृष्णा मॅरेथॉनमुळे कऱ्हाडची जागतिक पातळीवर क्रीडा क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण होईल,’ असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केले.
कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांच्या उपस्थितीत आणि डॉ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते ध्वज दाखवून सकाळी ६ वाजता कृष्णा रुग्णालाच्या प्रांगणातून मॅरेथॉनला प्रारंभ झाला. कृष्णा परिवारातील कृष्णा अभिमत विद्यापीठ, कृष्णा बँक, कृष्णा फाउंडेशन, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट स्कूल, कृष्णा महाविद्यालय, शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ आदी विविध संस्थांचे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, प्राध्यापक आणि हजारो विद्यार्थी मोठ्या संख्येने स्पर्धेत सहभागी झाले होते.
परुषांच्या १८ ते ४० वयोगटात शरद पवार, समीर शेख, विजय निकम यांनी; तर महिला गटात वर्षा बंडा, अनुराधा टकले व प्राजक्ता पवार यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकाविला. तसेच पुरुषांच्या ४१ वर्षांवरील गटात विश्वनाथ सोनावणे, संभाजी मदने, राजेंद्र गायकवाड यांनी; तर महिलांच्या गटात नीता शेवाळे, डॉ. मनीषा लद्दड व नंदा जाधव यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकाविला. दहा किलोमीटर अंतराच्या पुरूषांच्या १८ ते ४० वयोगटात विजय शिंंदे, मयूर कंक, दीपक देसाई यांनी; तर महिला गटात शैनी लोके, सुटिंग लिम व ऋजुता दुधे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकाविला. तसेच पुरुषांच्या ४१ वर्षांवरील गटात डॉ. प्रभाकर देसाई, चंद्रकांत पाटील, डॉ. मानसिंंग राजे; तर महिलांच्या गटात गौरी निलाखे, डॉ. यामिनी पाटील यांनी यश मिळविले.
विजेत्यांना डॉ. अभिनव देशमुख, डॉ. सुरेश भोसले, पोलीस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर, सोनाली लाड-देशमुख यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कृष्णा विद्यापीठाचे सहायक कुलसचिव एस. ए. माशाळकर व डॉ. संजय पाटील आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: The new identity of Karhad due to the marathon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.