‘सातबारा’वरील नवीन शर्त होणार कमी

By Admin | Updated: November 23, 2015 00:26 IST2015-11-22T21:30:41+5:302015-11-23T00:26:39+5:30

धोम धरणग्रस्तांसाठी शुभवर्तमान : वासोळे, आसगाव येथे मंगळवारी विशेष शिबिर

The new condition on 'Satbara' will be reduced | ‘सातबारा’वरील नवीन शर्त होणार कमी

‘सातबारा’वरील नवीन शर्त होणार कमी

कोरेगाव : धोम प्रकल्पामुळे सातारा व कोरेगाव तालुक्यांत पुनर्वसित झालेल्या खातेदारांच्या साताबारा उताऱ्यावरील नवीन अविभाज्य शर्त कमी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी मंगळवार, दि. २४ रोजी सातारा तालुक्यातील वासोळे व कोरेगाव तालुक्यांतील आसगाव येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.  या संदर्भात कृष्णा प्रकल्पग्रस्त विकास व ज्ञान प्रबोधन संस्थेचे सचिव व धोम प्रकल्पग्रस्त संघटनेचे सरपंच संजय शेलार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शासनाने धोम प्रकल्पग्रस्तांचे सातारा व कोरेगाव तालुक्यांत पुनर्वसन करताना त्यांच्या सातबारा उताऱ्यावर नवीन अविभाज्य शर्त घालून दिली होती. त्यामुळे त्यांना जमीन विषयक व्यवहार करताना तसेच कर्ज प्रकरणे करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. ही बाब आमदार शशिकांत शिंदे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी शासनस्तरावर प्रयत्न करून नवीन अविभाज्य शर्त कमी करण्यासाठी निर्णय घेण्यास भाग पाडले.
वासोळे येथे शिबिरास प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने, तहसीलदार राजेश चव्हाण तर आसगाव येथील शिबिरास कोरेगावचे प्रांताधिकारी अजय पवार, तहसीलदार रवी रांजणे, निवासी नायब तहसीलदार राजेंद्र देगावकर यांच्यासह मंडलाधिकारी, तलाठी व संबंधित विभागाचे लिपिक उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)


प्रकल्पग्रस्तांनी संधी सोडू नये : गाढवे
कोरेगाव तालुक्यातील आसगाव, आसरे, चांदवडी, भिवडी, मुगाव, न्हाळेवाडी, वेलंग (शिरंबे), वेलंग (कण्हेरखेड), बोरीव, कोंढवली, परतवडी व गोवे गावांतील प्रकल्पग्रस्तांनी या संधीचे सोने करावे. भविष्यात त्यांना या विशेष शिबिरातील निर्णयांचा फायदा होणार आहे. प्रकल्पग्रस्तांनी सहभागी व्हावे,’ असे आवाहन न्हाळेवाडीचे माजी सरपंच शिवाजीराव गाढवे यांनी केले आहे.

Web Title: The new condition on 'Satbara' will be reduced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.