कोणत्याही पक्षाची बाजू न घेता तटस्थपणा राहील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:37 IST2021-08-29T04:37:53+5:302021-08-29T04:37:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोणत्याही ठिकाणी राजकीय वातावरण हे असतंच. परंतु काम करताना आपण कोणत्याही पक्षाची, कोणत्याही ...

कोणत्याही पक्षाची बाजू न घेता तटस्थपणा राहील
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोणत्याही ठिकाणी राजकीय वातावरण हे असतंच. परंतु काम करताना आपण कोणत्याही पक्षाची, कोणत्याही संघटनेची बाजू घ्यायची नाही. आपण तटस्थ राहिलं पाहिजं. जे काय कायद्यात बसतं ते करायचं म्हणजे कोणाताही कायदेशीर प्रश्न उद्भवत नाही, असं मत सातारा शहर पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
शहर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस निरीक्षक निंबाळकर यांनी सातारा शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कोणती भूमिका घेतली जाईल, यावर आपले सडेतोड मत मांडले.
प्रश्न : कामाचे प्राधान्य काय असेल?
उत्तर : सातारा शहर हे महत्त्वाचे शहर आहे. लोकसंख्या पण जास्त आहे. त्या दृष्टीने या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील तरुण वर्ग असेल, व्यापारी, नोकरदार, व्यावसायिक हे सर्व लोक निर्भय वातावरणात राहिले पाहिजेत. जो कोणी दादागिरी करेल, गुंडगिरी करेल, अन्याय करेल अशा लोकांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, यावर माझे पहिले प्राधान्य राहील.
प्रश्न : राजकीय हस्तक्षेपाला कसे सामोरे जाणार?
उत्तर : कोणत्याही पक्षाचे राजकीय पदाधिकारी असतील, राजकीय लोक असतील, नेतेमंडळी असतील त्यांना त्रास द्यायचा किंवा त्यांच्यावर अन्याय करायचा. काहीएक प्रश्न नाही आणि तेही आपल्याला त्रास देणार नाहीत. परंतु जर कोणी काही बेकायदा कृत्य केलं तर कायदेशीर कारवाई करणार.
प्रश्न : तडीपारीबाबत आपली भूमिका काय असेल?
उत्तर : काही टोळ्यांना तडीपार केलेले आहे. त्यांचे रेकाॅर्ड मी तपासणार आहे. तडीपार केलेले लोक जर परत आले असतील तर त्यांना जेलमध्ये पाठवले जाईल.
साताऱ्यात यापूर्वीच्या अधिकाऱ्यांनी तडीपारीचे सत्र अवलंबले होते. त्यामध्ये सातत्य राहील. शहरात गुंडागर्दी अजिबात चालणार नाही. महिला, ज्येष्ठ नागरिक, व्यावसायिक, दुकानदार यांना निर्भय वातावरणात वावरता आलं पाहिजे. यासाठी प्रयत्न राहील. अन्याय होतोय, असं आपल्याला वाटलं तर थेट माझ्याशी संपर्क साधा.
- भगवान निंबाळकर, पोलीस निरीक्षक, सातारा शहर
चाैकट : नवीन गुंड उदयास येण्यापूर्वीच दक्ष..
कोणावरही अन्याय होत असेल तर माझ्याशी थेट संपर्क साधावा. त्यांच्यावर कडक आणि कायदेशीर कारवाई केली जाईल. तडीपारीबाबत जे प्रस्ताव आहेत. त्यांचा पाठपुरावा करून त्यांना तडीपार केले जाईल. नवीन गुंड उदयास येण्यापूर्वीच त्याचा बंदोबस्त केला जाईल, असा इशाराही निंबाळकर यांनी दिला.