शेजाऱ्यानेच घेतला गायत्रीचा बळी
By Admin | Updated: December 26, 2014 00:12 IST2014-12-25T22:58:52+5:302014-12-26T00:12:52+5:30
गूढ उकलले : मंडप कामगाराच्या क्रौर्याचा पर्दाफाश

शेजाऱ्यानेच घेतला गायत्रीचा बळी
खंडाळा : सहावर्षीय गायत्री जमदाडे हिच्या खुनाचा पर्दाफाश करण्यात खंडाळा पोलिसांना यश आले आहे. शेजाऱ्याकडे खेळण्यासाठी गेलेल्या गायत्रीला शेजाऱ्यानेच डोक्यात जोरदार फटका मारल्याने तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले असून, पोलिसांना गुंगारा देण्याचे आरोपीचे सर्व प्रयत्न फोल ठरवत पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
आरोपीने तपासात गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. ज्ञानेश्वर विलास धायगुडे ऊर्फ नोन्या असे आरोपीचे नाव असून, तो मंडपाच्या कामावर कामगार आहे. अहिरे (ता. खंडाळा) येथून गायत्री जमदाडे ही सहा वर्षांची मुलगी बेपत्ता झाली होती. तीन दिवसांनी तिचा छिन्नविच्छिन्न मृतदेह नीरा उजवा कालव्यात आढळला होता. खुनाची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी तपासचक्रे फिरविली असता, आरोपीच्या भयानक कृत्याचा पर्दाफाश झाला.
रविवारी (दि. १४) आजी रानात गेल्याने गायत्री आरोपी धायगुडेच्या घराच्या परिसरात खेळायला गेली होती; पण आरोपीने रागाच्या भरात गायत्रीच्या डोक्यात जोरात फटका मारला आणि गायत्री बेशुद्ध पडली. थोड्या वेळाने गायत्री मरण पावल्याचे त्याच्या लक्षात येताच आरोपीने मंडपाचे साहित्य भरण्याच्या पोत्यात गायत्रीचा मृतदेह भरला आणि ते शेजारच्या वापरात नसलेल्या घराच्या न्हाणीघरात ठेवले. कुणाच्या लक्षात येऊ नये म्हणून पोत्यावर दगड ठेवला. दुसऱ्या दिवशी मंडपाचा काथ्या त्याच पोत्यात भरला आणि मृतदेहासह ते पोते गाडीवर घेऊन त्याने नीरा उजवा कालव्यात टाकून दिले. गुन्ह्याचा कसलाही मागमूस त्याने ठेवला नव्हता; मात्र पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावलाच. पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल माकणीकर, पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्यासह कर्मचाऱ्यांनी गुन्ह्याचा छडा लावला. (प्रतिनिधी)
गुन्हेगारी पार्श्वभूमी
गायत्रीला एवढ्या जोरात फटका मारण्यामागे आरोपीच्या मनात कोणता राग होता, याबाबत पोलीस साशंक असून, कारणाचा शोध सुरू आहे. दरम्यान, आरोपी नोन्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असून, चोरी, मारामारी यासारख्या गुन्ह्यात तो पोलिसांच्या रडारवर होता.