मोठ्या उद्योगधंद्यांची ढेबेवाडीत गरज
By Admin | Updated: November 11, 2014 23:25 IST2014-11-11T22:00:52+5:302014-11-11T23:25:05+5:30
आस विकासाची : अनके गावे मूलभूत सुविधांपासून वंचित

मोठ्या उद्योगधंद्यांची ढेबेवाडीत गरज
सणबूर : ढेबेवाडी परिसराचा विकास म्हणावा तितक्या गतीने झालेला दिसत नाही़ अनेक गावे आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत़ या परिसराचा खऱ्या अर्थाने कायापालट होण्यासाठी ढेबेवाडी येथे एखादा मोठा उद्योगधंदा उभा राहण्याची गरज आहे़ तरच भागाचा कायापालट होऊन सुशिक्षित बेकारांच्या हाताला काम मिळेल़
पाटण तालुक्यामधील ढेबेवाडी खोरे अतिशय मागास व विकासापासून पूर्णपणे वंचित खोरे म्हणून ओळखले जाते़ या खोऱ्यातील कारळे, सातर, निवी, कसणी, पळशी, पानेरी, तामिणे, धनगरवाडी आदी गावे मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत़ येथील लोकांचे जीवन आदिवासींपेक्षा वेगळे नाही़ स्वातंत्र्योत्तर काळात सर्वत्र विकासकामांचे डोंगर उभे राहत असताना ढेबेवाडी विभाग मात्र पूर्णपणे दुर्लक्षित राहिलेला दिसतो़ दुर्गमता हे त्यापाठीमागील प्रमुख कारण आहे़ तालुक्यातील महत्त्वाचे व प्रमुख ठिकाण म्हणून ढेबेवाडीची ओळख आहे़ येथे मोठा उद्योगधंदा नाही़
पोलीस स्टेशन, ग्रामीण रुग्णालय, पोस्ट आॅफिस, बँका, पतसंस्था, दवाखाना, एसटी बसस्थानक, तलाठी कार्यालय, अशी शासकीय कार्यालये आहेत. मात्र येथील लोकांना कामधंद्यासाठी बाहेर जावे लागते़
परिसरातील बेरोजगारांच्या जीवनात स्थिरता येण्यासाठी गावाकडे उद्योगधंद्यांचे जाळे विणणे गरजेचे आहे़ डोंगराळ गावांमध्ये पशुपालनास पोषक वातावरण असल्याने दुधाचे उत्पादन घेतले जाते; परंतु दुर्गमतेमुळे व्यावसायिक दृष्टिकोन अजून तरी दूध उत्पादकांचा बनलेला नाही़
या व्यवसायाची भरभराट होऊन अनेकांना त्यातून उद्योग मिळण्यासाठी दुधावर प्रक्रिया करून उपपदार्थ तयार करण्याचा उद्योग राबविण्याची गरज आहे़ (वार्ताहर)
तरुणांचा लोंढा मुंबईकडे
या विभागामध्ये बेरोजगारांना दिलासा मिळेल, असा एकही छोटा-मोठा उद्योग नाही परिसरामध्ये बेरोजगारांची संख्या तर दिवसेंदिवस वाढतच चालली आहे़ पोटापुरते शिक्षण घेऊन या विभागातून तरुणांचा लोंढा वर्षानुवर्षे मुंबईकडे धावत आहे़ तिथे वाट्याला येणाऱ्या अस्थिर जीवनामुळे कित्येक कुटुंबे अस्वस्थ बनली आहेत़ येथून मुंबईकडे गेलेल्या तरुणांचे मुंबईत माथाडी कामगार, कापड दुकानातील नोकर, हातगाडी ओढणे असेच अस्तित्व आहे़