‘किसन वीर’मधून राष्ट्रवादीची माघार
By Admin | Updated: April 3, 2015 01:02 IST2015-04-03T01:00:26+5:302015-04-03T01:02:31+5:30
मकरंद पाटील : कर्जबाजारीपेक्षा नवीन कारखाना उभारू

‘किसन वीर’मधून राष्ट्रवादीची माघार
वाई/कवठे : ‘किसन वीर कारखान्यावर साडेपाचशे कोटींचे कर्ज असून, कर्जाच्या खाईत कारखाना लोटला आहे. काहीही केले तरी हा कारखाना कर्जातून बाहेर येऊ शकत नाही. डबघाईतील कारखाना ताब्यात घेण्यापेक्षा नवीन साखर कारखाना उभारून कार्यकर्त्यांच्या अडचणी दूर करण्यात येतील,’ असा विश्वास आमदार मकरंद पाटील यांनी व्यक्त केला. जोशीविहीर येथे गुरुवारी रात्री झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी लक्ष्मणराव पाटील, आमदार शशिकांत शिंंदे, नितीन भरगुडे-पाटील, सुरेश वीर तसेच जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कारखान्याच्या निवडणुकीत सहभागीही न होण्याचा निर्णय घेतला. यावेळी बोलताना आमदार शशिकांत शिंंदे म्हणाले, ‘कोणत्याही परिस्थितीत जर कारखाना कर्जमुक्त होऊ शकत नाही. याचा जर मकरंद पाटील आपण अभ्यास केला असेल तर आपण ही निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेऊयात. तसेच केंद्र व राज्य शासनाचे ऊस कारखानदारीबाबतचे चुकीचे धोरण आणि कोटींच्या कर्जाचा डोंगर असलेला कर्ज ज्याचे त्यानेच फेडूयात. ज्यांनी हे पाप केले आहे, त्याचे त्यांनाच फेडूद्यात व आपण दुसरा कारखाना उभारुयात.’
कारखान्याच्या जमिनीवरही कर्ज
आमदार पाटील म्हणाले, ‘मदन भोसले यांनी प्रतापगड साखर कारखाना चालवायला घेतला व त्याच्यावरील कर्ज भागविल्याचा डांगोरा पिटला; परंतु त्यांनी सर्व कर्ज न फेडता उलट पुन्हा त्याच्यावर कर्ज उचलले आहे. तसेच खंडाळा कारखान्यावर चिमणी व एक पेट्रोलपंप उभारला आहे. उभारलेल्या चिमणीवरसुद्धा कर्ज उचलले आहे.
आतापर्यंतच्या कोणत्याही संचालक मंडळाने किसन वीर कारखान्याच्या जमिनीवर कर्ज उचलले नव्हते; परंतु या महाशयांनी कारखान्याच्या जमिनीवरही कर्ज उचलले आहे. त्यामुळे डबघाईला आलेला हा कारखाना ताब्यात न घेतला तर आपला भविष्यकाळ सुखकर राहील, अन्यथा कारखाना ताब्यात घेऊन आपण आपल्याच पक्षाची हानी करणार आहे.
हा निर्णय घेण्यापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, रामराजे नाईक-निंंबाळकर व पक्षातील ज्येष्ठांच्या विचारानेच हा निर्णय घेतला आहे.’ राष्ट्रवादीच्या नेत्यांनी निर्णय दिल्यानंतर कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून समर्थन केले.