राष्ट्रवादीचे वर्चस्व; काँग्रेसचाही सूचक इशारा
By Admin | Updated: August 7, 2015 22:19 IST2015-08-07T22:19:05+5:302015-08-07T22:19:05+5:30
फलटण तालुका : ग्रामपंचायत निवडणूक; विरोधकांची दुही, राजे गटासाठी फायदेशीर--ग्रामपंचायत विश्लेषण

राष्ट्रवादीचे वर्चस्व; काँग्रेसचाही सूचक इशारा
नसीर शिकलगार - फलटण तालुक्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात बहुसंख्य ग्रामपंचायती आल्या आहेत. विरोधी काँग्रेसनेही अनपेक्षितपणे अनेक ग्रामपंचायतींत शिरकाव करून आपल्याला कमी लेखू नका, असा एक प्रकारचा इशारा दिल्याचे मानले जाते आहे.फलटण तालुक्यात अनेक पक्ष व नेतेमंडळी कार्यरत आहेत. मात्र, राजकीय वातावरण राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्याभोवतीच फिरताना दिसते. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीची एकहाती सत्ता फलटण तालुक्यावर आहे. २५ वर्षांपासूनच्या सत्तेला विरोधकांनी अनेकवेळा छेद देण्याचा प्रयत्न केला. मात्र, विरोधकांच्या दुहीमुळे तो शक्य झालेला नाही.काँग्रेस पक्ष तालुक्यात गटाअंतर्गत विखुरला गेला आहे. माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर, न्यू फलटण शुगर वर्क्स लि. साखरवाडीचे अध्यक्ष प्रल्हादराव साळुंखे-पाटील, ज्येष्ठ नेते सुभाषराव बेडके यांच्यात काँग्रेस विभागली गेली आहे. सध्या सुरू असलेल्या फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतून विरोधकांनी अंग काढून घेतले. त्यामुळे ग्रामपंचायतीमध्ये विरोधक किती तग धरतील, अशा चर्चा रंगल्या असताना कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर व प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांनी धूर्तपद्धतीने अनेक गावांत पॅनेल उभे केले.कार्यकर्त्यांना ताकद दिली. याचा परिणाम अनेक ग्रामपंचायतींमध्ये दिसून आला. अनेक महत्त्वाच्या ग्रामपंचायतींत रणजितसिंह व प्रल्हादराव पाटील यांनी सत्ता खेचून आणली. तालुक्यात प्रभावी विरोधाची भूमिका काँग्रेस पक्ष बजावू शकतो, हे त्यांनी दाखवून दिल्याचे चर्चिले जात आहे.रामराजे नाईक-निंबाळकर यांचे स्वीय सहायक असलेले मुकुंद रणवरे यांची निंभोरे ग्रामपंचायतीत अनेक वर्षांपासूनची सत्ता होती. या निवडणुकीत रणजितसिंहांनी मोठ्या चातुर्याने ही ग्रामपंचायत खेचून आणताना परिवर्तन घडविले आहे. साखरवाडी ग्रामपंचायत तर तालुक्यात प्रतिष्ठेची झाली होती. राजे गटातून तर एकजण सरपंचपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते. मोठेपणाने सरपंचपदाचा त्यांनी तालुक्यात आव आणल्याने त्याच्या उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र, ग्रामस्थांनी व खुद्द राजेगटातील अंतर्गत विरोधकांनी सपशेल त्यांना तोंडघशी पाडल्याने साखरवाडीत आता राजेगटात सरपंचपदासाठी चुरस वाढली आहे. साखरवाडी ग्रामपंचायतीमधील सत्ता का गेली? याचे आत्मचिंतन प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांना करावे लागणार आहे.
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सर्वच पक्षाचे कार्यकर्ते चार्ज झाले असले तरी सत्तेवर असलेली भाजपा-शिवसेना कार्यकर्ते योग्य नेतृत्वाअभावी तालुक्यात अद्याप शांतच दिसत आहेत.
अनेक गावातील परिवर्तन नेतेमंडळींना आत्मपरीक्षण करायला लावणारे आहे. आता सर्वाचे लक्ष सरपंचपदाच्या निवडीकडे लागले आहे.
कोळकी राजे गटाकडेच
राजकीयदृष्ट्या जागृत असलेली कोळकी ग्रामपंचायत राजे गटाने पुन्हा आपल्या ताब्यात ठेवली आहे. तेथे एक उमेदवार एक मताने तर दुसरा उमेदवार तीन मतांने निवडून आला आहे. तालुक्यात ७८ पैकी ६८ ग्रामपंचायती मिळाल्याचा दावा राजे गटाने तर १८ ग्रामपंचायती आम्ही मिळविल्याचा दावा विरोधी रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केला आहे. काँग्रेसच्या उमेदवारांचा झालेला शिरकाव दुर्लक्ष करण्याजोगा नाही.
जावली ग्रामपंचायतीवर ‘रासप’चे वर्चस्व
जावली : जावली, ता. फलटण येथील २०१५-२० या कालावधीसाठी घेण्यात आलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाने सर्वच्या सर्व नऊ जागा मिळवत निर्विवाद वर्चस्व मिळविले. निवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे पाच उमेदवार अशी तिरंगी लढत झाली.
गत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सहा जागा तर ‘रासप’ने तीन जागा मिळवल्या होत्या. यंदा काशिनाथ शेवते यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवून राष्ट्रवादीला धोबीपछाड देत सर्व जागांवर विजय मिळविला. या तून गावामध्ये जास्तीत जास्त सुविधा उपबल्ध करून देण्याबरोबरच गावातील अडचणी सोडवणार असल्याचे शेवते यांनी सांगितले. निवडून आलेले उमेदवार गजराबाई मदने, लता चवरे, बाळू पोकळे, काशिनाथ शेवते, रंजना पडर, सुरेखा नाळे, सुनील गायकवाड, नंदा आवटे, धनाजी नाळे असे आहेत.