जिल्ह्यात जणू राष्ट्रवादीचीच सत्ता!

By Admin | Updated: December 24, 2015 23:55 IST2015-12-24T23:08:43+5:302015-12-24T23:55:06+5:30

काँगे्रसकडून शिरकावाचे प्रयत्न : शिवसेना-भाजप पक्ष साताऱ्यात अजूनही आंदोलकांच्या भूमिकेतच--गुडबाय २०१५--राजकारण : भाग एक

NCP's power in the district! | जिल्ह्यात जणू राष्ट्रवादीचीच सत्ता!

जिल्ह्यात जणू राष्ट्रवादीचीच सत्ता!

सागर गुजर -- सातारा लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी व काँगे्रस या दोन सत्ताधारी पक्षांना जनतेने नाकारल्याने भाजप-शिवसेना व मित्रपक्षांचे सरकार आले. मात्र सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीपाठोपाठ काँग्रेसची लाट कायम राहिली. याचाच परिपाक म्हणजे २०१५ मध्ये झालेल्या विकास सेवा सोसायट्या, जिल्हा मध्यवर्ती बँक, बाजार समित्या, खरेदीविक्री संघ, मजूर फेडरेशन तसेच ८८२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी व काँगे्रस या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्येच लढाया झाल्या. बहुतांश ठिकाणी राष्ट्रवादीने आपली ताकद दाखवून देत विरोधकांना पाणी पाजले!
शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या सत्तेत सहभाग घेतल्यानंतर पुरंदरचे आमदार व पवारांचे कट्टर विरोधक विजय शिवतारे यांना सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री केले. त्यांच्या आक्रमक स्वभावामुळे सातारा जिल्ह्यात भगवे वादळ वाहिल, असे संकेत यामागे होते. मात्र, राजकीयदृष्ट्या शिवतारेंचा फारसा प्रभाव गतवर्षात पडलेला पाहायला मिळाला नाही.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेतील राष्ट्रवादीची सत्ता उलथून टाकण्याचे मनसुबे आखणाऱ्या भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांनी ऐन निवडणुकीवेळी तलवार म्यान केली. राष्ट्रवादीचे प्रमुख सत्ता केंद्र असणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये काँगे्रसचे आमदार जयकुमार गोरे यांनी शिरकाव केला. याच काळात खासदार उदयनराजे भोसले व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यात जोरदार वाक्युद्ध रंगले होते. उदयनराजेंच्या दबावतंत्रामुळे राष्ट्रवादीने त्यांच्याविरोधातील उमेदवार काढून घेऊन त्यांना बिनविरोध निवडून आणले; मात्र त्यांना माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर, आमदार जयकुमार गोरे यांच्याप्रमाणे विरोधात बसायला लागले. या निवडणुकीनंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व आमदार शशिकांत शिंदे यांचे जिल्हा बँकेतील वर्चस्व वाढलेले पाहायला मिळाले.
राज्यातील सत्ता गेल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादीच्या हातून गेले; परंतु खासदार शरद पवार यांनी विधान परिषदेतील आपल्या पक्षाच्या ताकदीच्या जोरावर सभापतिपद रामराजे नाईक-निंबाळकर यांना देऊन ही उणीव भरून काढली.
राज्यात सत्ता आल्यानंतर भाजप व शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेले चैतन्य नंतरच्या ग्रामपंचायती व सहकारी संस्थांच्या निवडणुकांत दिसले नाही. मात्र, पालकमंत्रिपदापाठोपाठ शिवसेनेला पोवई नाक्यावर भव्य कार्यालय मिळाले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन झाले. त्यानंतर पक्षाचा कारभार सुरळीतपणे सुरू झाला. शिवसेनेच्या तुलनेत भाजपला वरिष्ठ पातळीवरून म्हणावी तशी ताकद मिळाली नाही. मात्र, आगामी वर्षात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने या पक्षाने तयारी सुरू केल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
केंद्रातील पंतप्रधान कार्यालयाचा व्याप सांभाळणाऱ्या आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना काँगे्रसने मुख्यमंत्रिपद देऊन महाराष्ट्रात पाठवले. त्यामुळे ते राज्यात विशेष लक्ष घालू शकले. कऱ्हाडच्या राजकारणावरही ते यानिमित्ताने वचक ठेवू शकले. आता तर ते कऱ्हाड दक्षिणमध्ये विधानसभेला निवडून आले असल्याने स्थानिक पातळीवरील निवडणुकांत ते प्रभाव ठेवू शकले आहेत. मुख्यमंत्रिपदामुळे चव्हाण हे काँगे्रसचे राज्याचे नेतृत्व म्हणून उदयास आले. हे राजकीय नेतृत्व त्यांच्याकडे कायम आहे.
कऱ्हाडचे अतुल भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी माजी आ. विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या साथीने कृष्णा सहकारी साखर कारखान्याची सत्ता मिळविली. भाजपच्या माध्यमातून त्यांना लाल दिवा खुणावत आहे. माण-खटावचे किंगमेकर माजी आमदार सदाशिवराव पोळ यांचे निधन ही राष्ट्रवादीला चटका देणारी घटना घडली. या दोन तालुक्यांमध्ये आमदार जयकुमार गोरे व शेखर गोरे यांच्यातच सहकारी संस्थांच्या व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये झालेला सत्तासंघर्ष अधिकच धारदार झाला.
पाटण तालुक्यात आमदार शंभूराज देसाई यांनी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्याविरोधात विजय मिळविला होता. यानिमित्ताने शिवसेनेला जिल्ह्यात एकमेव आमदारपद मिळाले होते. आ. देसाई यांना मंत्रिपद मिळेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, अद्याप ती फलद्रूप झालेली नाही.
वाई विधानसभा मतदारसंघातले राजकारणही विशेष चर्चेचे ठरले. आमदार मकरंद पाटील यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी माजी आ. मदन भोसले यांनी विधानसभा निवडणुकीत आ. पाटील यांना ‘बाय’ दिल्यानंतर किसन वीर साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार गटाने भोसलेंना ‘बाय’ दिला.
भाजपचा मित्र पक्ष असणाऱ्या राष्ट्रीय समाज पक्षाला सत्तेत वाटा मिळून आमदार महादेव जानकर यांना मंत्रिपदाची संधी दिली जाईल, अशी चर्चा होती. सहकार मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापुरात तसे जाहीरही केले. मात्र, वर्षाच्या सरतेशेवटीही जानकरांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली.



विकासाच्या पातळीवर विचार केल्यास २०१५ चे वर्षही घोषणांमध्येच निघून गेले. साताऱ्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व महिला रुग्णालयाला मूर्तरूप तसेच माण-खटाव तालुक्यांना वरदान ठरणारी जिहे-कटापूर योजना पूर्ण करण्याची भीष्मगर्जना पालकमंत्री विजय शिवतारे यांनी केली होती. जिहे-कटापूरला निधी मिळवून देण्यात त्यांना काही प्रमाणात यश आल्याने हे काम पुन्हा सुरू झाले. पण वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रकल्प अजूनही पुढे सरकलेला नाही.

२०१५ मधील महत्त्वाच्या घडामोडी
माणचे किंगमेकर माजी आ. सदाशिवराव पोळ यांचे निधन
रामराजे नाईक-निंबाळकर यांना विधानपरिषद सभापतिपद
१९७२ पेक्षा भयंकर दुष्काळ; गतवर्षीच्या तुलनेत ५ हजार मिलीमीटर पाऊस कमी
वाई, कऱ्हाड तालुक्यांत अनुक्रमे ५६ व ५० टक्के पाऊस
जिल्हा मध्यवर्ती बँकेवर राष्ट्रवादीचे पुन्हा वर्चस्व
ग्रामपंचायतींच्या निवडणुकांत भाजप-शिवसेनेला सपशेल अपयश
सोसायट्या, मजूर फेडरेशन, बाजार समित्या, खरेदीविक्री संघ निवडणुकांतही राष्ट्रवादी सरस

Web Title: NCP's power in the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.