राष्ट्रवादीचा नैवेद्य खाऊन उडून गेले कावळे

By Admin | Updated: August 11, 2014 00:14 IST2014-08-10T23:01:53+5:302014-08-11T00:14:22+5:30

सुनील माने : रहिमतपूरच्या कार्यक्रमात येळगावकरांवर टीका

NCP's khawale was lost to Kawale | राष्ट्रवादीचा नैवेद्य खाऊन उडून गेले कावळे

राष्ट्रवादीचा नैवेद्य खाऊन उडून गेले कावळे

रहिमतपूर : ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वार्थासाठी आलेले निघून गेले, ते कावळे होते. कावळे आले आणि नैवेद्य खाऊन उडून गेले. आम्ही मात्र पक्षाचे सच्चे मावळे आहोत. त्यामुळे गेलेल्यांना भविष्यात पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही,’ असा टोला पक्ष सोडून गेलेल्या दिलीप येळगावकरांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी लगावला.
रहिमतपूर, ता. कोरेगाव येथे नगर परिषदेने आयोजित केलेल्या सत्कार समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आ. बाळासाहेब पाटील होते. पालकमंत्री शशिकांत शिंदे, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, आ. प्रभाकर घार्गे, माजी आमदार सदाशिव पोळ, नितीन भरगुडे-पाटील, मानसिंगराव जगदाळे, सुनील खत्री, बाळासाहेब सोळस्कर, सुरेखा पाटील, जितेंद्र पवार, किशोर बाचल, शाहूराज फाळके, नगराध्यक्षा उज्ज्वला माने आदी मान्यवर उपस्थित होते.
सुनील माने म्हणाले, ‘काही लोक सत्तेसाठी राजकारण करीत आहेत. त्यांना वेळेतच रोखण्यासाठी निष्ठावान फळी निर्माण करणे गरजेचे आहे.’
पालकमंत्री शिंदे म्हणाले, ‘ऐन निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यातील काही विरोधक पाण्याच्या बाबतीत मुद्दाम चुकीचे राजकारण करीत आहेत. त्यांनी जनतेला विनाकारण भडकवू नये.’
यावेळी मानसिंगराव जगदाळे, नितीन भरगुडे-पाटील, बाळासाहेब सोळस्कर, सुनील खत्री यांची भाषणे झाली.
यावेळी पालकमंत्री शशिकांत शिंदे यांच्या हस्ते सुनील माने यांचा सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, चांदीची गदा देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, वसंतराव कदम, शाहूराज फाळके, दाजी पवार, कांतिलाल पाटील, अ‍ॅड. नितीन भोसले, अरुण माने, तानाजी शिंदे, अमित कदम, सुभाष नरळे, कविता गिरी, श्रीमंत झांजुर्णे, अ‍ॅड. अशोक पवार, आनंदा कोरे, शशिकांत भोसले, संभाजी माने, सुखदेव माने उपस्थित होते.
यावेळी माजी नगराध्यक्ष वासुदेव माने यांनी प्रास्ताविक केले. विकास पवार यांनी सूत्रसंचालन केले. अविनाश माने यांनीआभार मानले. (वार्ताहर)

Web Title: NCP's khawale was lost to Kawale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.