राष्ट्रवादीच्या मुलाखती प्रश्नाविनाच रंगल्या

By Admin | Updated: August 26, 2014 22:03 IST2014-08-26T22:02:55+5:302014-08-26T22:03:31+5:30

राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, सुनील तटकरे यांनी उमेदवारांना प्रश्न विचारलेच नाहीत. सोलापूर, पुणे शहर, पुणे ग्रामीण, सांगलीच्या इच्छुक उमेदवारांना मात्र प्रश्न

NCP's interviews have not happened without question | राष्ट्रवादीच्या मुलाखती प्रश्नाविनाच रंगल्या

राष्ट्रवादीच्या मुलाखती प्रश्नाविनाच रंगल्या

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसकडून आगामी विधानसभा निवडणूकीसाठी इच्छूक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतीदरम्यान राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उमेदवारांना कोणतेही प्रश्न विचारलेच नाहीत. सोलापूर, पुणे शहर, पुणे ग्रामीण, सांगलीच्या इच्छुक उमेदवारांना मात्र पवार आणि तटकरे प्रश्न विचारत होते. अपवाद राहिला तो फक्त सातारचा. परिणामी जिल्ह्यातील मुलाखती प्रश्नाविनाच रंगल्या.
दरम्यान, मुलाखतीची दुसरी फेरी पुढील आठवड्यात होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी भवनातून देण्यात आली. सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीकडून विधानसभा लढवू इच्छिणाऱ्यांच्या मुलाखती मंगळवारी मुंबई येथे राष्ट्रवादी भवनात झाल्या. फलटण आणि माणमधून अनेक उमेदवारांनी मागणी केली होती. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुलाखतींना स्वत: खासदार उदयनराजे उपस्थित होते. विशेष म्हणजे मंगळवारी त्यांनी राष्ट्रवादी भवनात एकदा नव्हे तर दोन वेळा हजेरी लावली. त्यांनी अनेकांशी बातचितही केली. मंत्री शशिकांत शिंदे आणि माढाचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या शेजारी ते बसले होते. दरम्यान, कोरेगावातून मंत्री शशिकांत शिंदे, सातारा येथून आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, वाईतून आ. मकरंद पाटील, कऱ्हाड उत्तरमधून बाळासाहेब पाटील यांचे एकमेव अर्ज होते. या चारही मतदारसंघातून प्रत्येकी एकच अर्ज आला होता.
पहिल्या टप्प्यात सकाळी पुणे शहर, पुणे ग्रामीणच्या मुलाखती झाल्यानंतर सातारच्या इच्छुक उमेदवारांना पाचारण करण्यात आले. पहिल्यांदा फलटण तर शेवटी सातारमधून इच्छूक असणाऱ्यांच्या मुलाखती झाल्या. फलटणमधून आ. दीपक चव्हाण, नंदू मोरे, डॉ. सतीश बाबर, सुधीर अहिवळे, बापूराव जगताप, सुधीर तानाजी अहिवळे तर पाटणमधून आ. विक्रमसिंह पाटणकर आणि सत्यजितसिंह पाटणकर पितापुत्र उपस्थित होते. माणमधूनही राष्ट्रवादीकडे सर्वाधिक इच्छुक उमेदवार आहेत. आ. प्रभाकर घार्गे, सदाशिवराव पोळ, अनिल देसाई, कविता म्हेत्रे यांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते. त्यांचीही ओळखपरेड पवार आणि तटकरे यांच्यासमोर झाली.
दरम्यान, पवार, तटकरे यांनी मुलाखतीवेळी जिल्ह्यातील इच्छुक उमेदवाराला प्रश्न विचारले नाहीत अथवा राष्ट्रवादीने आपल्यालाच का उमेदवारी द्यावी, अशी विचारणाही केली नाही. (प्रतिनिधी)

‘कऱ्हाड दक्षिण’ राष्ट्रवादीने लढवावा
‘कऱ्हाड दक्षिण’ मतदार संघ राष्ट्रवादीने लढवावा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्याकडे केली आहे. येथून सुभाष पाटील, पांडूरंग चव्हाण यांनी उमेदवारी मागणी अर्ज भरला होता. पवारांनी कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर स्मितहास्य करत या मागणीवर कोणतेही भाष्य केले नाही.
वाई राष्ट्रवादीकडेच राहणार
वाईतून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लढावे, अशी मागणी काँग्रेसची असल्याचे जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब भिलारे यांनी शरद पवारांना सांगितले. पवारांनीही त्यांच्याकडे एकटक पाहत ‘वाई विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे आणि तो राष्ट्रवादीकडेच राहणार’, असे प्रकर्षाने नमूद केले.

Web Title: NCP's interviews have not happened without question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.