वडूज, लोणंदमध्ये राष्ट्रवादीचाच झेंडा

By Admin | Updated: August 23, 2015 23:50 IST2015-08-23T23:49:24+5:302015-08-23T23:50:23+5:30

बाजार समिती निवडणूक : खंडाळा तालुक्यात सत्ता टिकवण्यात सत्ताधाऱ्यांना यश

NCP's flag in Vaduz, Lonand | वडूज, लोणंदमध्ये राष्ट्रवादीचाच झेंडा

वडूज, लोणंदमध्ये राष्ट्रवादीचाच झेंडा

खंडाळा : खंडाळा तालुक्यातील लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत सहकार पॅनेलने काँग्रेसप्रणित शेतकरी विकास पॅनेलचा धुव्वा उडवित विजयी घोडदौड कायम राखली. राष्ट्रवादीने १८ पैकी १७ जागा जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले, तर काँग्रेसला व्यापारी मतदारसंघातील एका जागेवरच समाधान मानावे लागले.
लोणंद बाजार समितीमध्ये आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनेल रिंगणात होते. चुरशीने झालेल्या मतदानातही राष्ट्रवादीने मोठ्या फरकाने विजय मिळवित तालुक्यावरील आपली पकड मजबूत केली. या निवडणुकीत सोसायटी गटात ६१८, ग्रामपंचायत गटात ५००, व्यापारी गटात ३३२ तर हमाल व मापाडी गटात १३८ मतदान झाले होते.
राष्ट्रवादीप्रणित पॅनेलमधून सोसायटी गटातून नामदेव धायगुडे (३६९), आनंदराव वाघमोडे (३६७), सागर जाधव (३६०), उत्तम धायगुडे (३५२), शिवाजी मोरे (३४७), नारायण क्षीरसागर (३४३), भरत गाढवे (३३८), सुनील नेवसे (३८१), कमल पवार (३९०), आशा लिमण (३८५), हे विजयी झाले तर. ग्रामपंचायत गटातून अनंत तांबे (३३४), रमेश शिंदे (२७४), मनोज पवार (३१८), संगीता
गायकवाड (३२२) यांनी विजय मिळविला. हमाल व मापाडी गटातून विश्वास शिरतोड (९६) हे विजयी झाले. व्यापारी गटातून बाळकृष्ण रासकर (१५१) हे यांनी विजय खेचून आणला तर व्यापारी गटातून काँग्रेसचे राहुल नागर (१६७) हे वैयक्तिक प्रभावामुळे निवडून आले. राष्ट्रवादीचे दत्तात्रय बिचुकले हे सोसायटी मतदारसंघातून बिनविरोध निवडून आले आहेत.
आमदार मकरंद पाटील यांचा तालुक्यावरील प्रभाव या निवडणुकीत दिसून आला. निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पंचायत समिती परिसरात गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी केली.
मतमोजणीसाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अमर झालटे यांनी काम पाहिले तर चव्हाण यांनी सहायक अधिकारी म्हणून सहकार्य केले. (प्रतिनिधी)

Web Title: NCP's flag in Vaduz, Lonand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.