शिवेंद्रसिंहराजेंशी सलगीसाठी राष्ट्रवादीचा उतारा... तर भाजपचा खडा पहारा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:26 IST2021-07-20T04:26:35+5:302021-07-20T04:26:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : स्थानिक स्वराज्य संस्था तसेच सहकारी संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत. या निवडणुकांची जोरदार तयारी सर्वच ...

NCP's exit for intimacy with Shivendra Singh Raje ... then BJP's stone guard! | शिवेंद्रसिंहराजेंशी सलगीसाठी राष्ट्रवादीचा उतारा... तर भाजपचा खडा पहारा!

शिवेंद्रसिंहराजेंशी सलगीसाठी राष्ट्रवादीचा उतारा... तर भाजपचा खडा पहारा!

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : स्थानिक स्वराज्य संस्था तसेच सहकारी संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत. या निवडणुकांची जोरदार तयारी सर्वच पक्षांनी हाती घेतलेली आहे. यानिमित्ताने सातारा जिल्ह्यात राजकारणाचा एक वेगळाच रंग पाहायला मिळत आहे, राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलेले शिवेंद्रसिंहराजे भोसले हे पुन्हा राष्ट्रवादीत यावेत, यासाठी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते साखरपेरणी करताना दिसत आहेत. तर दुसर्‍या बाजूला भाजपचे नेते घातपात टाळण्यासाठी शिवेंद्रसिंहराजे यांच्याभोवती पहारा ठेवून आहेत.

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा सातारा, जावली, कोरेगाव आणि कऱ्हाड उत्तर या चार विधानसभा मतदार संघांमध्ये प्रभाव आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवेंद्रसिंहराजे हे राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेले. सातारा जावली विधानसभा मतदार संघांमध्ये राष्ट्रवादीची मोठी ताकद असतानादेखील भाजपच्या चिन्हावर मात्र स्वतःच्याच कर्तुत्वावर शिवेंद्रसिंहराजे हे निवडून आले. राष्ट्रवादीचे सर्व नेते विरोधात असतानादेखील त्यांनी विजयश्री खेचून आणली.

शिवेंद्रसिंहराजे जरी भाजपमध्ये गेले असले तरी त्यांचे सैन्य अजूनही राष्ट्रवादीमध्येच आहे. चार विधानसभा मतदार संघांतील शिवेंद्रसिंहराजे यांचे नेतृत्व मानणारे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य हे अजूनही राष्ट्रवादीमध्येच आहेत. आता आगामी काळामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका होणार आहेत. या निवडणुका कोणत्या चिन्हावर लढवायच्या, याचा आदेश शिवेंद्रसिंहराजेंकडून येण्याची ते वाट पाहत आहेत. त्यामुळे आगामी काळात संघर्ष होण्याची दाट शक्यता आहे. तो टाळण्यासाठी राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील नेते शिवेंद्रसिंहराजे यांच्याशी जुळवून घेण्यास इच्छुक आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हाच धागा पकडून जिल्हा बँकेत येऊन शिवेंद्रसिंहराजे यांची भेट घेतली.

जिल्हा मध्यवर्ती बँकेची सार्वत्रिक निवडणूकही कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. या निवडणुकीत भाजपदेखील इच्छुक राहणार, हे निश्चित असले तरी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठिंब्याशिवाय किंवा त्यांनी पुढाकार घेतल्याशिवाय या निवडणुकीला सामोरे जाणे भाजपला कठीण आहे. ही सगळी राजकीय परिस्थिती पाहता, भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते शिवेंद्रसिंहराजे यांच्याशी सलगी करण्यासाठी तीव्र इच्छुक असल्याचे पाहायला मिळतात.

आशिष शेलार यांनी केली गुफ्तगू

पावसाळी अधिवेशनात झालेल्या अभूतपूर्व गोंधळानंतर भाजपचे नेते आमदार ॲड. आशिष शेलार यांना एक वर्षासाठी निलंबनाला सामोरे जावे लागले. या निलंबनानंतर दुसऱ्याच दिवशी आमदार शेलारांनी साताऱ्याचा दौरा केला. त्यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची सुरुची बंगल्यावर वैयक्तिक भेट घेतली तसेच कमराबंद गुफ्तगूदेखील केली. ईडीने जिल्हा बँकेला दिलेली नोटीस आणि नगरपालिकेची आगामी निवडणूक या अनुषंगाने दोन्ही नेत्यांनी गुफ्तगू केल्याची जोरदार चर्चा आहे. शिवेंद्रसिंहराजे हे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आहेत. केंद्रात सत्तेवर असलेले भाजपचे सरकार विरोधकांना नामोहरम करण्यासाठी ईडीचा वापर करत असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते वारंवार करत आहेत, या पार्श्वभूमीवर शेलार यांनी घेतलेली ही भेट महत्त्वाची आहे.

जयंत पाटलांनी धरला हा हट्ट..

विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षात कोंडमारा होत असल्याच्या भावनेने शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. शिवेंद्रसिंहराजेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडल्याने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती तसेच मंत्रीपदाच्या तुकड्यासाठी शिवेंद्रसिंहराजे भाजपमध्ये गेले, अशी टीका केली होती. मात्र, एका खासगी दौऱ्यानिमित्त साताऱ्यात आलेल्या जयंत पाटील यांनी जिल्हा बँकेमध्ये शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्तेच बुके घेण्याचा हट्ट धरला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशा पद्धतीने हट्ट करतात म्हणजे काहीतरी पाणी मुरते आहे, असं म्हणायला वाव आहे.

ईडीची बँकेला नोटीस... अन् नेत्यांच्या भेटीगाठी

सक्तवसुली संचालनालयाने जरंडेश्वर शुगर मिलची चौकशी सुरू केली आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने या कारखान्याला वित्तपुरवठा केला होता, त्या अनुषंगाने ईडीने जिल्हा बँकेकडे कर्ज पुरवठ्याबाबतची माहिती मागवली होती. जिल्हा बँकेचे अध्यक्षपद शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे आहे तर बहुतांश सत्ताधारी संचालक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. ईडीच्या नोटीसनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व त्यानंतर आशिष शेलार यांनी चर्चा केली तर आहे, खासगी दौऱ्यानिमित्त आलेल्या जयंत पाटील यांनीदेखील शिवेंद्रसिंहराजे यांची बँकेत भेट घेतली. एकूणच सत्ताधारी आणि विरोधक एकाचवेळी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याभोवती जाळे विणताना दिसत आहेत.

फोटो नेम : १९ Shivendra

फोटो ओळ : सातारा येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत रामराजेंच्या हातातील बुके शिवेंद्रसिंहराजे यांच्या हातात देऊन त्यांच्या हस्ते सत्कार करून घेण्याची इच्छा त्यांनी पूर्ण केली.

Web Title: NCP's exit for intimacy with Shivendra Singh Raje ... then BJP's stone guard!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.