राष्ट्रवादीचे उमेदवारच चव्हाणांसोबत !

By Admin | Updated: October 1, 2014 23:59 IST2014-10-01T23:31:06+5:302014-10-01T23:59:04+5:30

विधानसभा निवडणूक : राजेंद्र यादव यांचा अर्ज पक्षाने मागे घ्यायला लावला

NCP's candidate is with Chavan! | राष्ट्रवादीचे उमेदवारच चव्हाणांसोबत !

राष्ट्रवादीचे उमेदवारच चव्हाणांसोबत !

कऱ्हाड : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना होमपीचवरच खिळवून ठेवण्यासाठी राष्ट्रवादीकडून आज एक खेळी खेळली गेली़ राष्ट्रवादीने राजेंद्र यादव यांना दक्षिणेतून दिलेली उमेदवारी त्यांना मागे घ्यायला लावली़ मात्र, यामुळे चिडलेल्या यादवांनी थेट पृथ्वीराज चव्हाणांची भेट घेतल्याने राष्ट्रवादीची खेळी त्यांच्याच अंगलट आल्याची चर्चा सुरू झाली.
राजेंद्र यादवांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्जही भरला होता; पण गत दोन दिवसांत नाट्यमय घडामोडी होऊन यादवांना अर्ज मागे घेण्याचा आदेश आणि अमुक-तमुक उमेदवाराला पाठिंबा देण्याची विनंतीही करण्यात आली़ त्यानंतर नाराज यादवांनी आज सकाळी पृथ्वीराज चव्हाण उंडाळे जिल्हा परिषद गटात संपर्क दौऱ्यात असताना महारुगडेवाडी येथे त्यांची भेट घेतली़ त्या दोघांत झालेल्या दहा मिनिटांच्या चर्चेनंतर राजेंद्र यादव थेट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी अर्ज मागे घेतला़ दरम्यान, ‘कऱ्हाड दक्षिणच्या उमेदवारीसाठी मी राष्ट्रवादीच्या दारात गेलो नव्हतो़ त्यांनीच शेवटच्या घटकात मला उमेदवारी दिली़ असे असताना मला पूर्वकल्पना न देता अपक्ष उमेदवार विलासराव पाटील-उंडाळकर यांना पाठिंबा जाहीर करून राष्ट्रवादीने माझ्या पाठीत खंजीर खुपसला,’ अशी टीका उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव यांनी केली़ उपनगराध्यक्ष यादव म्हणाले, ‘राष्ट्रवादीने माझ्याशी गद्दारी केली़ मला माहितीही न होता त्यांनी कऱ्हाड दक्षिणेत उंडाळकरांना पाठिंबा दिल्याचे वृत्त वाहिन्यांवर जाहीर केले़ त्यातून त्यांनी माझा अपमान केला़ वास्तविक, मी तिकिटासाठी कधीही आग्रही नव्हतो़ पक्षाला गरज भासल्याने अखेरच्या वेळी मला उमेदवारी देण्यात आली़ मात्र, मी अर्ज भरल्याच्या दुसऱ्या दिवसापासून स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक मला मदत करणे टाळले़’

चार दिवसांत भूमिका स्पष्ट
सातारा : राजेंद्र यादव यांनी कऱ्हाड उत्तरमधून उमेदवारी अर्ज मागे घेतल्याबाबत माजी मंत्री शशिकांत शिंदे यांना अधिक छेडले असता त्यांनी ‘पक्षश्रेष्ठी तीन ते चार दिवसांत आपली भूमिका स्पष्ट करतील,’ अशी माहिती यावेळी दिली.

Web Title: NCP's candidate is with Chavan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.