पेट्रोल, डिझेल, खते दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:41 IST2021-05-18T04:41:55+5:302021-05-18T04:41:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : केंद्र सरकारच्या धोरणांमुळे पेट्रोल व डिझेल तसेच खत दरवाढ झाल्याने सर्वसामान्यांना वेठीस धरले गेले ...

पेट्रोल, डिझेल, खते दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : केंद्र सरकारच्या धोरणांमुळे पेट्रोल व डिझेल तसेच खत दरवाढ झाल्याने सर्वसामान्यांना वेठीस धरले गेले आहे, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवारी साताऱ्यात दुचाकी ढकलून आंदोलन करण्यात आले.
भारतात पेट्रोल व डिझेलच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. शंभर रुपयांच्यावर पेट्रोलचे दर गेलेले आहेत. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दुसरा धक्का दिला आहे, त्यामुळे देशातील शेतकरी आधीच अडचणीत असताना खताची दरवाढ करून केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. खताच्या किमती भरमसाठ वाढविण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे. १०-२६-२६ खताची किंमत ७०० रुपयांनी वाढले आहे. डीएपीची किंमत जवळपास ७१५ रुपयांनी वाढली आहे. डीएपी १ हजार १८५ रुपयांना मिळायचा, तोच आता एक हजार ९०० रुपयांना जाऊन पोहोचला आहे. १०-२६-२६ चे ५० किलोचे पोते ११७५ रुपयाची होते ते आता १७७५ रुपयांना मिळत आहे. या सोबतच पोटॅशियमचे किमती वाढल्या आहेत. देशातल्या खतांच्या किमती वाढवण्याचे काम सरकारने केले तरी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दरवाढीचा निषेध करीत आहोत, केंद्र सरकारने ताबडतोब खताची केलेली दरवाढ मागे घ्यावी व सर्वसामान्य शेतकर्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच या दरवाढीविरोधात आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
या आंदोलनात जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, युवक जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस समिंद्रा जाधव, महिला आघाडी पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस संगीता साळुंखे, युवती काँग्रेस प्रदेश सचिव स्मिता देशमुख, युवक प्रदेश सरचिटणीस गोरखनाथ नलावडे, विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सचिव अतुल शिंदे, शुभम साळुंखे, सेवादल प्रदेश संघटक राजेंद्र लावंघरे, अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष शफिक शेख, पारिजात दळवी, औद्योगिक सेलचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय ढमाळ इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो ओळ : सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी राष्ट्रवादीतर्फे आंदोलन करण्यात आले.