जिल्ह्यातील ७५ गावे राष्ट्रवादी दत्तक घेणार!
By Admin | Updated: August 23, 2015 00:29 IST2015-08-23T00:29:43+5:302015-08-23T00:29:43+5:30
सुनील तटकरे : ग्रामपंचायती, सहकारी संस्थांमधील पक्षाचे यश महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्याचे आश्वासन

जिल्ह्यातील ७५ गावे राष्ट्रवादी दत्तक घेणार!
सातारा : ‘जिल्ह्यातील नेतेमंडळींनी कार्यकर्त्यांची चांगली फळी बांधून ग्रामपंचायती व सहकारी संस्थांमध्ये देदीप्यमान यश मिळविले आहे. सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे, हे दाखवून दिले असून, पक्षाचे हे यश राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचविणार आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील ७५ गावे दत्तक घेण्याची तयारी राष्ट्रवादीने केली आहे. ’ असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले.
येथे शनिवारी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा विद्याताई चव्हाण, युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निरंजन डावखरे, आ. शशिकांत पाटील, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. प्रभाकर घार्गे, आ. दीपक चव्हाण, आ. बाळासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
सुनील तटकरे म्हणाले, ‘सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून राष्ट्रवादीने विजयाची श्रृंखला सुरू केली. केंद्रामध्ये राष्ट्रवादीची सत्ता जाऊनदेखील सातारा जिल्ह्यात मात्र विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक आमदार राष्ट्रवादीचे निवडून आले. महाराष्ट्रात इतरत्र याउलट परिस्थिती पाहायला मिळाली. त्यामुळे सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे, हे सिद्ध झालेले आहे. देशात मोदींची लाट असतानाही सातारा जिल्ह्यातील ४५६ ग्रामपंचायती व बहुतांश सहकारी संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने सत्ता प्रस्थापित केली. या यशानंतर राष्ट्रवादीत आनंदाचे वातावरण पसरले असून, सातारचे हे यश राज्यभर नेणार आहे. या यशानंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे कौतुक करण्यासाठी माजी मुख्यमंत्री अजित पवार स्वत: येणार होते; पण ते राज्य बँकेच्या बैठकीत असल्याने ते या कार्यक्रमासाठी येऊ शकले नाहीत.’
मोदी सरकारच्या कार्यपद्धतीवरही तटकरे यांनी यावेळी झोड उठविली. ते म्हणाले, ‘देशात भाजपची नव्हे तर केवळ मोदींची सत्ता आहे. परदेश दौऱ्यावर जाण्याचा त्यांनी विक्रम नोंदविला आहे; पण या दौऱ्याद्वारे एक रुपयाची गुंतवणूकही देशात झालेली नाही. त्यांनी सर्वांना स्वप्नरंजनात गुंतविले. भुलभुलैय्या निर्माण केला. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे ऊसशेती गोत्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना उभं करणारी सहकारी चळवळ अडचणीत आणण्यासाठीही सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांपासून सरकार कोसो दूर आहे. त्यामुळे देशात मोदी सरकारबद्दल तीव्र संतापाची लाट पसरलेली आहे. शिवसेनेची दुटप्पी भूमिका असल्याने राज्यातील हे सरकार टिकले आहे. सत्तेसाठी आम्ही हापापलेलो नाही; पण सरकार अन्याय करत असेल तर राष्ट्रवादी पक्ष ते खपवून घेणार नाही.’
९ आॅगस्ट क्रांती दिनादिवसाचेही भाजपाला गांभीर्य नव्हते. राष्ट्रवादीने आवाज उठविल्यानंतर संध्याकाळी उशिरा शिक्षणमंत्री विनोद तावडे धावत-पळत या कार्यक्रमाला आले. भाजपला शेतकऱ्यांचे व नव्या पिढीच्या प्रश्नांचे काही देणे-घेणे राहिले नाही.’ असा आरोपही तटकरे यांनी केला.
रामराजे म्हणाले, ‘जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांचा प्रश्न गंभीर आहे. पालकमंत्री विजय शिवतारे यांनी आधी पाणी टंचाईची बैठक आयोजित करणे आवश्यक आहे. आस्मानी संकटासोबत सुलतानी संकटाने शेतकरी हैराण आहे. ३५० प्रवर्गांना खूश करण्यासाठी मोदी सरकारने कार्यक्रम आखले. त्यांनी राजकारणाची पद्धत बदलली; पण टंचाई निवारणासाठी व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने उद्योजकांवर ज्यादा कर बसवावा; पण दुष्काळग्रस्तांना मदत करावी. दुष्काळी तालुक्याचे राजकारण चालवताना काळ्या पैशांचा वारेमाप वापर होत असल्याचा आरोप त्यांनी केला. दहशतीच्या राजकारणाला विरोध करण्यासाठी राष्ट्रवादीने सज्ज राहण्याचे आवाहन त्यांनी केले.’
यावेळी बोलतना आ. शशिकांत शिंदे म्हणाले, ‘केंद्रात व राज्यात नसलं तरी सातारा जिल्ह्यात मात्र राष्ट्रवादीचंच सरकार आहे. आघाडी सरकारच्या काळात सातारा जिल्ह्यात मोठा निधी आला, त्यामुळे विकासकामांना गती देता आली; पण सध्या मात्र केंद्र व राज्याकडून येणारा निधी पूर्णपणे बंद झालेला आहे. हा निधी न मिळाल्यास सरकारला सळो की पळो करून सोडू. उद्धव ठाकरे, राज ठाकरे व विनोद तावडे यांना महाराष्ट्राच्या जनतेची नाडीच कळालेली नाही. त्यांना वारसाहक्काने पदे मिळाली आहेत. भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या शाही स्नानासाठी धरणातील पाणी सोडले जाते. हे सरकार बिनकामाचे असल्याने ते उलथून टाकण्यासाठी साताऱ्यातूनच क्रांती घडेल.’
यावेळी जिल्ह्यातून राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी