राष्ट्रवादीच्या बैठकीकडे नाराज गटाची पाठ !
By Admin | Updated: March 7, 2016 00:20 IST2016-03-06T21:07:18+5:302016-03-07T00:20:08+5:30
सुनील माने : नेत्यांशी चर्र्चेनंतरच उपाध्यक्षांच्या राजीनाम्याचा निर्णय; नवीन सभापतींच्या नावाबाबतही उत्सुकता

राष्ट्रवादीच्या बैठकीकडे नाराज गटाची पाठ !
सातारा : जिरवाजिरवीच्या राजकारणातून अर्थसंकल्पीय सभा तहकूब करण्याबरोबरच उपाध्यक्षांच्या राजीनाम्याला होत असलेल्या विलंबामुळे राष्ट्रवादीमध्ये आणखीनच गटबाजी उफाळून येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचा प्रत्यय रविवारी झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीमध्येही दिसून आला. या बैठकीकडे राष्ट्रवादीच्या नाराज गटाने चक्क पाठ फिरवली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात आणखीनच अस्वस्थता पसरली आहे.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांच्या शासकीय निवासस्थानी रविवारी राष्ट्रवादीने बैठक बोलाविली होती. या बैठकीला सगळ्यांच सदस्यांना निमंत्रण धाडण्यात आली होती. दुपारी दोन वाजता बैठकीची वेळ ठरली होती. मात्र, बैठक सुरू होण्यास तीन वाजले. जसे पहिल्या बैठकीला झाडून सदस्य आले होते. तसे या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी सदस्यांमध्ये निरुत्साह दिसून आला. केवळ २८ सदस्यांनी या बैठकीला हजेरी लावली. ज्या चार सभापतींनी राजीनामे दिले आहेत. त्यापैकी समाज कल्याण सभापती मानिसिंगराव माळवे हे एकमेव उपस्थित होते.
या बैठकीकडे नाराज सदस्यांनी का पाठ फिरविली, असा प्रश्न राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, ‘असे काही नाही. सगळ्यांनाच आम्ही निरोप दिला होता. मात्र काही कारणास्तव ते आले नाहीत. याचा अर्थ गटबाजी आहे, असा होत नाही.’
जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याच्या अनुषंगाने ही दुसऱ्यांदा बैठक घेण्यात आली; मात्र उपाध्यक्षांच्या राजीनाम्याबाबत या बैठकीत काही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. खासदार उदयनराजेंशी चर्चा करून येत्या दोन दिवसांत पक्षाची भूमिका जाहीर करू, असे गेल्या बैठकीवेळी सांगण्यात आले होते. दरम्यान नवीन सभापतींच्या नावाबाबत उत्सुकता लागली आहे. (प्रतिनिधी)
उदयनराजे दिल्लीत...निर्णय अधांतरीच !
इकडे साताऱ्यात ‘राजीनामा नाट्य’ हा विषय घेऊन राष्ट्रवादीच्या बैठकी झडत असल्या तरी खासदार उदयनराजे भोसले हे अधिवेशनामुळे सध्या दिल्लीत आहेत. त्यामुळे उपाध्यक्षांच्या राजीनाम्याचा निर्णय अधांतरीच राहत आहे. आता केवळ पक्षातील बंडोबांना थंड करून त्यांची नाराजी दूर करण्यापलीकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांना काहीच साध्य करता येईनासे झाले आहे.
उदयनराजे दिल्लीत...निर्णय अधांतरीच !
इकडे साताऱ्यात ‘राजीनामा नाट्य’ हा विषय घेऊन राष्ट्रवादीच्या बैठकी झडत असल्या तरी खासदार उदयनराजे भोसले हे अधिवेशनामुळे सध्या दिल्लीत आहेत. त्यामुळे उपाध्यक्षांच्या राजीनाम्याचा निर्णय अधांतरीच राहत आहे. आता केवळ पक्षातील बंडोबांना थंड करून त्यांची नाराजी दूर करण्यापलीकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांना काहीच साध्य करता येईनासे झाले आहे.