राष्ट्रवादी नगरसेवकांचा सुशांत निंबाळकरांवर हल्ला
By Admin | Updated: July 6, 2014 00:31 IST2014-07-06T00:31:02+5:302014-07-06T00:31:21+5:30
फलटण : नेत्यांंविरोधात बोलतो म्हणून घरासह गाडीचीही तोडफोड

राष्ट्रवादी नगरसेवकांचा सुशांत निंबाळकरांवर हल्ला
फलटण : ‘साताऱ्यामधील आॅनलाईन वृत्तपत्रात बातमी का दिली, फलटणमधील राष्ट्रवादीच्या नेत्यांविरोधात का बोलतोस,’ या कारणावरून चिडून जाऊन ‘राष्ट्रवादी युवक’चे माजी जिल्हाध्यक्ष सुशांत निंबाळकर यांना मारहाण करून जखमी केले. तसेच गाडी व घराचे नुकसान केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांसह दहा ते बाराजणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.
सुशांत बापूसाहेब निंबाळकर यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात फिर्याद
दिली आहे. या फिर्यादीत म्हटले आहे की, सुशांत निंबाळकर हे आज, शनिवारी
दुपारी एकच्या सुमारास कुटुंबीयांसमवेत विद्यानगर येथील घरी होते. यावेळी दोन नगरसेवक सनी संजय अहिवळे (रा. मंगळवार पेठ, फलटण) व गुड्ड्या ऊर्फ किशोर
धनराज पवार (रा. बुरुड गल्ली, फलटण) यांच्यासह सलीम शेख (रा. पाचबत्ती चौक, फलटण), अभिजित बाळासाहेब जानकर (रा. शुक्रवार पेठ), राजू बोके (रा. मंगळवार पेठ), सिद्धार्थ अहिवळे (रा. मंगळवार पेठ, फलटण) व आणखी दहा ते बाराजण
घरात आले.
‘फलटण विधानसभा मतदारसंघात आता तिसरा पर्याय’ या शीर्षकाखाली सातारा येथील एका आॅनलाईन वृत्तपत्रास तू बातमी का दिलीस, फलटण येथील ‘राष्ट्रवादी’च्या नेत्यांविरोधात भडक का बोलतोस, तुझ्याकडे बघून घेतो, बंगल्यावर नेऊन तुला चिरतो,’ असे म्हणत शिवीगाळ करीत या नगरसेवकांनी मारहाण केली. या हल्ल्यात सुशांत निंबाळकर यांच्या डोक्याला इजा झाली असून, हल्लेखोर फरार आहेत. त्यांच्याविरोधात भादंविस कलम १४३, ७७, ४५२, २३३, ५०४, ५०६, ४२७ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. (प्रतिनिधी)
आई-वडिलांनाही मारहाण
हल्लेखोरांनी घरातील लहान मुलाची सायकल फेकून सुशांत यांना जखमी केले. या मारहाणीत निंबाळकर यांचे ब्रेसलेटही गहाळ झाले. मारहाण सोडविण्यासाठी गेलेल्या आई-वडील व पत्नीलाही मारहाण केली, असेही या फिर्यादीत म्हटले आहे.