मुख्यमंत्र्यांच्या कऱ्हाडात राष्ट्रवादीची खलबते

By Admin | Updated: August 31, 2014 00:20 IST2014-08-31T00:18:15+5:302014-08-31T00:20:18+5:30

प्रचाराला बोलवा, मी हजर : जयंतराव म्हणे... काका, मैं हूं ना !

The NCP is the Chief Minister's office in Karhad | मुख्यमंत्र्यांच्या कऱ्हाडात राष्ट्रवादीची खलबते

मुख्यमंत्र्यांच्या कऱ्हाडात राष्ट्रवादीची खलबते

कऱ्हाड : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची कऱ्हाड दक्षिणची संभाव्य उमेदवारी सध्या भलतीच चर्चेत आहे़ पण मुख्यमंत्र्यांना होमपीचवरच खिळवून ठेवण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी खलबते सुरू केली आहेत़ म्हणूनच की काय, या आठवड्यात पालकमंत्री शशिकांत शिंदे, ग्रामीण विकास मंत्री जयंत पाटील यांचे दक्षिणेत जाहीर कर्यक्रम अन् उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांचा दक्षिण राष्ट्रवादीचा मेळावा झाल्याचे मानले जाते़
पृथ्वीराज चव्हाण यांनी दक्षिणेतून लढण्याचे संकेत दिल्यापासून हा मतदारसंघ चांगलाच ‘हॉट’ बनला आहे़ अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष याकडे लागले आहे़ मुख्यमंत्र्यांना दक्षिणेतच खिळवून ठेवण्यासाठी भाजप नेत्यांनीही खेळ्या सुरू केल्या आहेत़ मुख्यमंत्री उभे राहिले तर जशास तसा उमेदवार आमच्या संपर्कात असल्याचा भाजप नेते खासगीत दावा करत आहेत़ पण, यात मित्रपक्ष राष्ट्रवादीही कुठे मागे दिसत नाही़
ओंड येथे अ‍ॅड़ दीपक थोरात यांनी आयोजित केलेल्या भूमिपूजन समारंभाला पालकमंत्री शशिकांत शिंदे उपस्थित होते़ राष्ट्रवादीच्या नेत्यांसह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भीमराव पाटील यांची उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेणारी होती़
पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या मेळात दिसणारे भीमराव पाटील सध्या बंडखोरीच्या पवित्र्यात असणाऱ्या अतुल भोसलेंच्या गटात घुसले आहेत़ भोसलेंच्या व्यासपीठावरून थेट मुख्यमंत्र्यांच्यावर निशाणा साधणारे भीमराव पाटील राष्ट्रवादीचे मंत्री शशिकांत शिंदे यांच्या व्यासपीठावर दिसल्याने त्यांची उलट-सुलट चर्चा सुरू आहे़
रेठरे खुर्द येथे पाटबंधारे विभागाच्या भूमिपूजन समांरभास ग्रामीण विकास मंत्री जयंत पाटील व दक्षिणचे आमदार विलासराव पाटील यांचा संयुक्त कार्यक्रम झाला़
या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे स्थानिक नेते कोणीच उपस्थित नव्हते; पण या कार्यक्रमात मंत्री पाटील यांनी ‘विलासकाका उंडाळकर यांची पाठराखण करा,’ असे आवाहन तर केलेच; पण ‘माझा अन् काकांचा पक्ष वेगळा आहे़त्यामुळे मी त्यांना उमेदवारी देऊ शकत नाही; पण काका मला प्रचाराला बोलवा, मी नक्की येईन,’ असे सांगून विलासराव पाटील उंडाळकरांना बळ देत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची कळच काढल्याचे मानले जाते़ (प्रतिनिधी)
राष्ट्रवादीच्या मेळाव्यात निर्णय नाही
उत्तरेचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी नुकताच कऱ्हाड दक्षिणच्या राष्ट्रवादीचा मेळावा घेतला; पण त्यांना अजून दक्षिण मतदारसंघाचा मेळ घालता आलेला दिसत नाही़ कारण त्यांचं भाषण कऱ्हाड शहरासह दक्षिणेत समाविष्ट झालेल्या त्या १३ गावांभोवतीच फिरत होते़ अन् ‘तिसरा पर्याय देण्याबाबत प्रमुख कार्यकर्त्यांनीच दक्षिणेतील इतर गावातील लोकांशी चर्चा करावी,’ असं सांगत त्यांनी पक्षश्रेष्ठींच्या कोर्टात चेंडू टाकला़ त्यामुळे दक्षिणेवर स्वारी करण्याबाबतचा निर्णय झालाच नाही़
 

Web Title: The NCP is the Chief Minister's office in Karhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.