राष्ट्रवादीलाही खालच्या पातळीवर जाता येते !
By Admin | Updated: August 9, 2014 00:26 IST2014-08-09T00:01:53+5:302014-08-09T00:26:59+5:30
नेत्यांचा प्रतिटोला : पक्षाची लायकी काढणारे येळगावकर म्हणजे ‘जल बिन मछली’

राष्ट्रवादीलाही खालच्या पातळीवर जाता येते !
सातारा : ‘येळगावकरांनी जरा जपून बोलावे, आम्हाला आव्हान देण्याची भाषा करू नये. राष्ट्रवादी ‘भाकड’ की ते... हे काळच ठरवेल,’ असा इशारा जलसंपदामंत्री शशिकांत शिंदे यांनी दिला तर ‘येळगावकर म्हणजे ‘जल बिन मछली’ असून राष्ट्रवादीला ‘भाकड’ म्हणणाऱ्यांना राष्ट्रवादीवासी होताना भाजपही ‘भाकड’ वाटू लागला होता,’ अशी कोपरखळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी मारली.
राष्ट्रवादी सोडून भाजपवासी होण्यास निघालेल्या दिलीप येळगावकर यांनी गुरुवारी राष्ट्रवादी आणि त्याच पक्षातील काही नेत्यांवर पत्रकार परिषद घेऊन सडकून टीका केली होती.
राष्ट्रवादी म्हणजे, ‘भाकड’ असल्याची उपरोधिक टीका करण्याबरोबरच राष्ट्रवादीची लायकी दाखवून देऊ, असे आवाहनही दिले होते. त्या अनुषंगाने मंत्री शशिकांत शिंदे, राज्य नियोजन आयोगाचे कार्याध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर आणि सुनील माने यांनी शनिवारी येळगावकरांना लक्ष्य केले.
ज्या राष्ट्रवादीने त्यांना पक्षात आल्यानंतरच सहा महिन्यांत जिल्हाध्यक्ष केले त्या येळगावकरांना राष्ट्रवादीवर भाष्य करण्याचा कोणताच अधिकार नसल्याचे सांगून मंत्री शशिकांत शिंदे म्हणाले, ‘ज्यांनी सन्मान दिला त्यांच्यावर टीका करण्याची येळगावकरांची जुनी परंपरा आहे.
माण-खटावच्या पाणीप्रश्नांच्या अनुषंगाने त्यांनी भाजपवर टीका करत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. आता तर माण-खटावचा पाणीप्रश्न सुटणे अंतिम टप्प्यात असताना त्यांना राष्ट्रवादी नकोशी झाली. आम्ही त्यांना अजूनही चांगले मित्र मानतो. त्यांनी खालच्या पातळीवर येऊन टीका करू नये, आम्हालाही तुमच्यापेक्षा खालच्या पातळीवर जाता येते, याचे भान राहू द्या. यापुढील काळात तुम्ही कधी आम्हाला आव्हान देण्याची भाषा करू नका. ज्या पक्षाने मान-सन्मान दिला त्याच्यांवर टीका करणे बंद करा. ‘भाकड’ कोण हे काळच ठरवेल. ’
भाजप सोडून राष्ट्रवादीत येताना भाजप ‘भाकड’ आणि राष्ट्रवादीत अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत म्हणून राष्ट्रवादी ‘भाकड’ असे येळगावकरांना वाटत असल्याचे सांगून सुनील माने म्हणाले, ‘ज्या पक्षातून ते आमदार झाले. त्याच पक्षाच्या नेत्यांवरही त्यांनी याचप्रकारे टीका केली होती. राष्ट्रवादी वाईट असल्याचा दृष्टांत त्यांना आता काही दिवसांतच झाला आहे. राष्ट्रवादी सोडल्यानंतर पुढे काहीच राजकीय भवितव्य नाही म्हणून ते राष्ट्रवादीवर टीका करत सुटले आहेत.’
दरम्यान, माजी जिल्हा परिषद सदस्य महेश शिंदे यांनी केलेल्या टीकेबाबत विचारले असता ‘ते जिल्ह्यात कितीवेळ असतात आणि बाहेर कितीवेळ असतात. याची त्यांना तरी माहिती असते का?’ असे सांगत यावर अधिक बोलण्यास नकार दिला. (प्रतिनिधी)
राष्ट्रवादीत येण्यापूर्वी येळगावकरांनी भाजपवर टीका केली होती. आम्हाला पक्षात घ्या, म्हणून त्यांनी आमच्या पायऱ्या झिजविल्या. आता ते भाजपमध्ये हेच करत आहेत. राष्ट्रवादीत शिस्त आहे. शिस्त पाळत असताना काही बाबींना मुरड घालावी लागते. ही साधी बाब त्यांना समजत नसेल तर आम्ही तरी काय करणार. परिणामी त्यांना आता राष्ट्रवादी ‘भाकड’ वाटू लागली आहे. मात्र, त्यांना योग्यवेळी उत्तर दिलेच जाईल, असा इशारा मंत्री शशिकांत शिंदे यांनी दिला.
इतर आमदारांचे ‘नो कॉमेंट्स’
माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी केलेल्या टीकेच्या अनुषंगाने राष्ट्रवादीच्या अन्य आमदारांशी संपर्क साधला असता त्यांनी अधिक भाष्य करण्यास नकार दिला. पाटणचे आमदार विक्रमसिंह पाटणकर यांनी ‘यावर जिल्हाध्यक्ष सुनील मानेच बोलतील’ असे सांगत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. ‘माण-खटावचे राजकारण आणि येथील पाणीप्रश्नाविषयी माझा फारसा संबंध येत नाही. त्यामुळे मी यावर काही बोलणार नाही,’ असे आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी नमूद केले. वाईचे आमदार मकरंद पाटील यांनीही बोलण्यास नकार दिला. फलटणचे आमदार प्रा. दीपक चव्हाण यांच्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
त्यांचे ते वाक्य स्वत:साठीच असावे..!
राष्ट्रवादीकडून ‘पतीव्रतेच्या गळ्यात धोंडा अन्... मणिहार’ अशी टीका येळगावकरांनी केली होती. त्या अनुषंगाने माने यांना छेडले असता येळगावकरांनी ‘ते भाजपमधून आमच्याकडे आले होते. त्यामुळे ते वाक्य बहुधा त्यांनी स्वत:साठीच वापरले असावे,’ असे सांगत खिल्लीच उडविली. ते म्हणाले, ‘मंत्री शशिकांत शिंदे हेच माण-खटावच्या जनतेला पाणी देऊ शकतात, असे सांगणाऱ्या येळगावकरांना एका रात्रीत दृष्टांत कसा झाला. कालपर्यंत शिंदे आणि रामराजेंच्या चांगुलपणाचे गुण गाणारे येळगावकर टीका करत आहेत. भाजप सोडताना त्यांनी गडकरी, मुंडे, तावडे यांच्यावर टीका केली. आता राष्ट्रवादी सोडताना ते आमच्या नेत्यांवर टीका करत आहेत.’