बोंद्रीत सरपंच निवडीवर राष्ट्रवादीचा बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:36 IST2021-02-12T04:36:50+5:302021-02-12T04:36:50+5:30
रामापूर : बोंद्री, ता. पाटण ग्रामपंचायतीची सत्ता मिळविण्यासाठी अंधश्रद्धेचा आधार घेणाऱ्या नेत्यांची व त्यांच्या दबावाला बळी पडलेल्या ग्रामपंचायत सदस्यांची ...

बोंद्रीत सरपंच निवडीवर राष्ट्रवादीचा बहिष्कार
रामापूर : बोंद्री, ता. पाटण ग्रामपंचायतीची सत्ता मिळविण्यासाठी अंधश्रद्धेचा आधार घेणाऱ्या नेत्यांची व त्यांच्या दबावाला बळी पडलेल्या ग्रामपंचायत सदस्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी केली आहे. या मागणीसाठी त्यांनी सरपंच, उपसरपंच निवडीच्या कार्यक्रमावर बहिष्कार घातला असून, लोकशाहीची गळचेपी करणाऱ्यांचा निषेध केला.
दरम्यान, याबाबतचे निवेदन राष्ट्रवादीच्या ग्रामपंचायत सदस्या सुप्रिया नंदकुमार आरेकर, विशाल दिनकर सुतार, सुशांत सिद्धार्थ भोळे यांनी प्रांताधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार तसेच पोलीस निरीक्षकांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमातील सरपंच, उपसरपंच निवड कार्यक्रमात बोंद्री ग्रामपंचायतीचा समावेश आहे. या ग्रामपंचायतीमध्ये एकूण सात सदस्यांचा नव्याने समावेश झाला आहे. सातपैकी पाच सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत, तर दोन सदस्य निवडणूक प्रक्रियेतून निवडून आले आहेत. बिनविरोध सदस्यांचा कोणत्याही राजकीय गटातटाशी अथवा पक्षाशी संबंध नाही. असे असताना गावातील काही नेत्यांनी बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांना गावदेवाच्या मंदिरात देवदर्शनाला नेले. त्याठिकाणी एका राजकीय गटाचा दबाव आणून या गटाशीच पाच वर्ष कायम राहा. सरपंच, उपसरपंच निवडणुकीत मतदान करा. यासाठी मंदिरातील अंगारा, गुलाल उचलून जबरदस्तीने शपथ घ्यायला लावली. तसेच ऐनवेळी वेगळा निर्णय घेतल्यास तुमच्या मुलांना, कुटुंबाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीतीही या सदस्यांच्या मनावर घातली आहे.
या सर्व प्रकारामुळे सरपंच, उपसरपंच निवडणुकीत सदस्यांचे मतदान त्यांच्या मनाविरुद्ध होत आहे. हा एकूण प्रकार अंधश्रद्धेचा भाग असून, संविधान व लोकशाहीची गळचेपी करणारा आहे. या प्रकाराचा निषेध व्यक्त करून राष्ट्रवादीच्या सदस्यांनी सरपंच, उपसरपंच निवडणूक कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे.
अंधश्रद्धेचा असा प्रकार करण्यास भाग पाडणाऱ्या नेत्यांवर कारवाई करावी, अशी राष्ट्रवादीच्या ग्रामपंचायत सदस्या सुप्रिया आरेकर, विशाल सुतार, सुशांत भोळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.