लोणंद : सुखेड, ता. खंडाळा गावाच्या हद्दीत ६ फेब्रुवारी रोजी विहिरीत आढळून आलेल्या अनोळखी तरुणाच्या मृतदेहाचे गूढ अखेर उलगडले असून हा खून असल्याचे निष्पन्न झाले आहे. स्थानिक गुन्हे शाखा व लोणंद पोलिसांनी वेगवान तपास करत चार आरोपींना अटक केली. यामध्ये नवी मुंबईपोलिस दलातील एका पोलिसाचा समावेश आहे. खून केल्यानंतर मृतदेह त्यांनी कारमधून सुखेडमध्ये आणून पुरावा नष्ट केल्याचे तपासात समोर आले.सोमनाथ कल्याण बोबडे (वय ३५, रा. कळंबोली, ता. पनवेल, जि. रायगड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. सुखेड, ता. खंडाळा येथील एका विहिरीमध्ये दि. ६ रोजी त्याचा मृतदेह पाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या प्रकरणात पोलिसांनी तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि टोल नाक्यावरील नोंदींच्या आधारे धागेदोरे मिळवत गुन्ह्याचा छडा लावला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी बंडू बापू भिसे (वय ४९) हा नवी मुंबईतील रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात हवालदार पदावर कार्यरत आहे. तो मूळचा दुधी बावी, ता. फलटण येथील आहे. भिसे याचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. दरम्यान, मृत सोमनाथ बोबडे याचेसुद्धा त्या महिलेशी संबंध जुळल्याने तणाव निर्माण झाला होता. याचदरम्यान भिसे याचे काही फोटो व व्हिडीओ बोबडेच्या हाती लागल्याने तो भिसेला ब्लॅकमेल करत असल्याचे तपासात समोर आले.
या त्रासाला कंटाळून भिसे याने सोमनाथचा काटा काढण्याचा कट रचला. त्यासाठी त्याने मित्र विजय पोपटराव पवार (वय ३६, रा. मर्कट मळा, साखरवाडी, ता. फलटण) याला सोबत घेतले. पवारने पुढे किरण विकास गायकवाड (वय २७, सध्या रा. नरे, आंबेगाव, पुणे; मूळ रा. होळ मुरूम) आणि श्रीनिवास ज्ञानेश्वर लोणे (वय २५, सध्या रा. धायरी, पुणे; मूळ रा. चुर्मापुरी, ता. अंबड, जि. जालना) या दोन रिक्षाचालकांना कटात सहभागी करून घेतले.आरोपींनी सोमनाथ बोबडेला कळंबोली येथे बोलावून घेतले. तेथे कारमध्ये बसवून त्याचा दोरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह कारमध्ये टाकून खंडाळा तालुक्यातील सुखेड येथे आणण्यात आला. पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पेट्रोलने जाळून विहिरीत फेकून सर्वजण फरार झाले.असा लागला छडापोलिसांनी खेड शिवापूर टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावेळी पोलिसांना एक कार टोलनाक्यावरून दोन ते तीनवेळा ये-जा करताना दिसून आली. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. त्यावरून तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपींपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले. यानंतर पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली.
Web Summary : A Navi Mumbai police officer and three others were arrested for murdering a man, Somnath Bobade, due to a love triangle and blackmail. The body was dumped in a well in Sukhed, Satara. CCTV footage led to their capture.
Web Summary : नवी मुंबई के एक पुलिसकर्मी और तीन अन्य को प्रेम त्रिकोण और ब्लैकमेल के चलते सोमनाथ बोबडे की हत्या के आरोप में गिरफ्तार किया गया। शव को सतारा के सुखेड में एक कुएं में फेंक दिया गया था। सीसीटीवी फुटेज से उनकी गिरफ्तारी हुई।