नवजा, महाबळेश्वरला पावसाची उघडीप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:43 IST2021-08-25T04:43:43+5:302021-08-25T04:43:43+5:30

सातारा : जिल्ह्यात पावसाची दडी कायम असून, पावसाचा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना, नवजा आणि महाबळेश्वरलाही दोन दिवसांपासून उघडीप ...

Navaja, Mahabaleshwar exposed to rain | नवजा, महाबळेश्वरला पावसाची उघडीप

नवजा, महाबळेश्वरला पावसाची उघडीप

सातारा : जिल्ह्यात पावसाची दडी कायम असून, पावसाचा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना, नवजा आणि महाबळेश्वरलाही दोन दिवसांपासून उघडीप आहे. महाबळेश्वरमध्ये फक्त अवघा एक मिलिमीटरच पाऊस पडला, तर कोयना धरणातील पाणीसाठा ९४ टीएमसीवर झाला असून, इतर धरणांतही चांगला साठा उपलब्ध आहे.

जिल्ह्यात जुलै महिन्याच्या मध्यावर दमदार पाऊस कोसळला. पूर्व दुष्काळी भागात चांगला पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिकांना नवसंजीवनी मिळाली. तर पश्चिम भागातील कोयना, नवजा, महाबळेश्वर, तापोळा, बामणोली या भागात तुफान वृष्टी झाली होती. यामुळे शेतीचे नुकसान झाले. तसेच रस्ते, पूल वाहून गेले. या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. प्रमुख धरणांत पाण्याची आवक वेगाने झाली. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणांतून पाणी सोडण्यात आले. कोयना धरणात तर मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली होती. अवघ्या काही दिवसांत धरणांतील पाणीसाठा ९० टीएमसीच्या वर गेला होता. तसेच कण्हेर, उरमोडी, धोम, बलकवडी, तारळी यासारख्या धरणांतूनही मोठ्या प्रमाणात विसर्ग करावा लागला. मात्र, गेल्या १० दिवसांपासून तुरळक स्वरुपात पाऊस पडत आहे.

जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाची दडी कायम आहे, तर पश्चिम भागातही उघडीप आहे. मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयना, नवजा येथे पावसाची नोंद झाली नाही. मात्र, महाबळेश्वरला अवघा एक मिलिमीटर पाऊस पडला. तर कोयनेला जूनपासून ३५७१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. नवजाला ४६७९ आणि महाबळेश्वर येथे यावर्षी आतापर्यंत ४८१२ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे.

चौकट :

धोममध्ये १२, कण्हेरमध्ये ११ टीएमसी साठा...

गेल्या काही दिवसांत पावसाची उघडीप आहे. मात्र, पश्चिम भागातील प्रमुख धरणांत चांगला पाणीसाठा झालेला आहे. धोम धरणात ११.९७ टीएमसी इतका साठा आहे, तर कण्हेरमध्ये ८.९१, उरमोडी ८.४५, बलकवडीत ३.७४, तारळी धरणात ५.३२ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र, खटाव तालुक्यातील येरळवाडी तलावात अवघा ६.४७ टक्के पाणीसाठा आहे.

...............................................................

Web Title: Navaja, Mahabaleshwar exposed to rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.